
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची कृषी अधिकाऱ्यांना धमकी
_शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कृषी अधिकाऱ्यांना चोप देऊ – जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना_
बुलढाणा: खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अंकुर कृषी केंद्रावर शेतकऱ्याकडून सोयाबीन बियाणांवर प्रतिबॅक 600 रुपये जादा वसूल केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याआधी सुद्धा शेतकऱ्यांच बियाणं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवणूक केल्या जात असल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालक मोठ्या प्रमाणात लुटत असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने अंकुर कृषी केंद्रावर कारवाई करण्यात आली. त्याच पद्धतीने इतर कृषी केंद्रांवर देखील शेतकऱ्यांना फसवणूक होत असेल तर कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून करण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांना जर कृषी अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं तर कृषी अधिकाऱ्यांना आणि कृषी केंद्र चालकांना चोप देऊ अशी धमकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी दिली आहे.