
जीव माझा गुंतला
अवचित हे स्वप्न जागले
त्या स्पर्शात मी मिटले
काय घडले काही कळेना
रंगात त्याच्या मी रंगले
भूमीवरी पाऊल पडेना
मना लागले असे पिसे
भाववेड्या माझ्या मनाला
आता आवरु मी कसे
गात्रांत चैतन्य चेतले
क्षण क्षण उत्सव झाला
तोची गंध कस्तुरीचा
अंगभरी मी लपेटला
फुलाफुलांत फुलूनिया
मीच आता फूल जाहले
त्याच्या अस्तित्वाच्या खुणा
जळीस्थळी शोधू लागले
निळे आभाळ पांघरूनी
ओढाळ स्पर्श शोधते
लाजताना मी आता
नभी चांदणी ही लाजते
तोच नाद बासरीचा
दूर वेळूतून घुमला
त्या धुंद स्वरलहरीत
हा जीव माझा गुंतला
निळ्या सावळ्याचे गारुड
माझ्या अंगभरी पसरले
मीच सावळ्याच्या आता
शिरी मोरपीस शोभले
मना लागे निळी चाहूल
अंगांग हे मोहरले
अंतर्यामी तो झिरपत गेला
मीच कान्हा जाहले
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली
===÷===