
स्वयंसिद्ध
आरशात जसे पाहतो स्वतःला,
तसे,मनात डोकावून पहावे,
स्वअस्तित्वाची ओळख पटून
कार्यपूर्ततेसाठी, स्वयंसिद्ध व्हावे.
पोलादाला तापविल्या शिवाय
त्यास,इच्छित आकार येत नाही,
स्वतःची परीक्षा घेतल्या शिवाय
यशाचे शिखर दिसत नाही.
चंदनाचे लाकूड घासल्याशिवाय
त्याचा सुगंध दरवळत नाही,
कठोर परिश्रमाशिवाय कधीच
जीवनात सुख समाधान येत नाही.
कसोटी आहे स्वयंसिद्धत्वाची
त्यास,पार हिंमतीने करू,
स्वसामर्थ्याने आव्हाने पेलून
अडसर मार्गातील दूर करू.
जिद्द अन चिकाटी
असावी सदैव सोबत,
खडतर परीक्षे साठी
मनात असावी हिंमत.
साहस आणि तत्परता
यशाचे निरंतर सोबती,
साथसंगत त्यांची सदा
यशास खेचून आणती.
भित्रेपणा,डरपोकपणा
आळस आणि कंटाळा,
कार्यआरंभां अगोदरच
नेहमीच करती घोटाळा.
स्वयंसिद्ध,होण्याच्या मार्गावरील
अडसर तुम्ही जाणावे,
तडीपार त्यास करून
जीवन आत्मविश्वासाने जगावे.
मायादेवी गायकवाड
मानवत, परभणी
=====