‘किसी का भाई, किसी की जान’; डॉ अनिल पावशेकर

‘किसी का भाई, किसी की जान’; डॉ अनिल पावशेकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भाग क्रमांक ०४

हर्बीवोर सफारी अर्थातच तृणभक्षक प्राण्यांच्या सफारीत काळवीट, ठिपक्यांचे हरीण, नीलगाय रोही, मोर यांचा समावेश होतो. या सफारी करिता ४० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली असून याकरिता जंगल आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत ही थीम साकारली आहे. एकाचवेळी इतक्या प्राण्यांचे कळप पाहून डोळ्यांचे पारणे फिटते‌‌. कधी काळवीटांच्या नैसर्गिक सौंदर्याचे तर कधी मोरांचे मनमोहक दर्शन घडते. सोबतच निवांतपणे चरणारे हरीणांचे कळप पाहून मनाला समाधान वाटते तर कधी उंच धिप्पाड नीलगायी तुमचे लक्ष वेधून घेतात. इतक्या प्रमाणात मुके प्राणी एकमेकांशी मिळून मिसळून राहतांना पाहून हम साथ साथ है ची आठवण येते.

या प्राण्यांपैकी काळवीट हे कुरंग कुळातील प्रमुख हरीण असून या प्रजातीचा दुर्मिळ गटात समावेश झाला आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ अंतर्गत भारतात काळवीटांच्या शिकारीस मनाई आहे. काळवीट हा सामाजिक प्राणी असून १० ते ५० च्या कळपात राहतो. काळवीट मुळात सावध आणि लाजाळू असल्याने सहसा नजरेस पडत नाही. त्यांच्यात गंध आणि श्रवणाची क्षमता तुलनेत तीक्ष्ण नसल्याने दृष्टी वर अवलंबून असतात. चांगली दृष्टी त्यांना धोके शोधणे आणि त्वरित प्रतिक्रिया देण्यास मदत करते. धोका जाणवताच ते हवेत उडी मारून पळून जातात. काळवीटाची कमाल गती ८० किमी प्रती तास इतकी असू शकते.

काळवीटांचा वावर प्रामुख्याने भारतातील शुष्क प्रदेशातील माळरानावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत, रेहेकुरी इथे काळवीटांचे अभयारण्य आहे. तसेच पुणे, सोलापूर सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानात सुद्धा आढळून येतात. नर काळवीट मादी काळवीटापेक्षा आकारमानाने मोठे असतात. उंची ७४ ते ८४ सेमी, लांबी १.८ मीटर आणि वजन २० ते ५७ किलो इतके असते. नरांना ३५ ते ७५ सेमी लांब रिंग्ड, सर्पील आकाराची शिंगे असतात. ही शिंगे पोकळ असून हाडांच्या सांगाड्याचा एक भाग असतो. तसेच ही शिंगे कधीही गळून पडत नाही. मादी काळवीटांमध्ये लहान शिंगे विकसित करण्याची क्षमता असते.

नर काळ्या रंगाचा तर मादी भुऱ्या रंगाची असून नरांच्या वरच्या पृष्ठीय आवरणाचा रंग गडद तपकिरी, काळा असतो तर खालच्या बाजूचे शरीर पांढरे असते. पायांचे खुर नाजूक आणि टोकदार असतात. नाकपुड्या अरूंद, मेंढीसारख्या आणि लहान शेपटी असते. गवत, फुलांची रोपे आणि बाभळीचे झाडे हा त्यांचा प्रमुख आहार असतो. काळवीट संवादासाठी विविध आवाज काढू शकतात. त्यांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. साधारणपणे सहा महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मादा काळवीट एका वासराला जन्म देते. नर नवजातच्या डोक्यावर आणि मानेवर काळे ठिपके असतात तर मादा नवजात पिवळ्या रंगाची असते. बाळ काळवीट जन्मानंतर लवकरच धावू शकतो.

खरेतर काळवीट या प्राण्याला प्रकाशझोतात आणण्याचे काम केले ते म्हणजे सुपरस्टार सलमान खानने. नुकताच सलमानचा भाईजान हा रिलीज झाला आहे ‌ ‘किसी का भाई किसी की जान’ ही त्या सिनेमाची कॅचलाईन. १९९८ ला हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर, राजस्थानला असतांना त्याच्यावर दोन काळवीटांच्या शिकारीचा आरोप आहे. भलेही सलमान आपल्या चाहत्यांसाठी भाई असला तरीही काळवीट हे बिष्णोई समाजासाठी जान आहे, आराध्य आहे. नेमके सलमान इथेच चुकला आणि काळवीट शिकार प्रकरणी त्याला सहा दिवसांचा तुरुंगवास घडला होता.

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सलमानला येणाऱ्या काळात, काळवीटांच्या शिकारीचा काळा अध्याय काळवंडून सोडेल की तो नेहमीप्रमाणे सहिसलामत सुटेल हे सध्यातरी सांगणं कठीण आहे.एक मात्र खरे, कुठेही प्रवास अथवा पर्यटनाला जातांना तिथल्या स्थानिक संस्कृतीचा आदर करणे गरजेचे आहे. अन्यथा सलमानसारखे तुम्ही कितीही बीईंग ह्युमन असले तरी मुक्या प्राण्यांना सुद्धा जगण्याचा तुमच्याएवढाच अधिकार आहे हे विसरून कसे चालणार? काळवीट शिकार प्रकरणी केवळ सलमानच नाही तर त्याचे सहकारी सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे ही मंडळी सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडली होती.

(क्रमशः,,,)

दि. ११ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles