एक कप चहा..

एक कप चहा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ऑफिस मधून थकून आल्यावर, चेहऱ्यावरचे हावभाव बघून पती राजांनी पटकन आले टाकून गरमागरम एक कप चहा बनवला व माझ्यापुढे आणला. लगेच आश्चर्य व्यक्त करीत, चहाचा घोट घेतला नि चित्त शांत झाले. गरमागरम चहात अशी कोणती गंमत आहे की थकलेलं, तापलेलं, चिडलेलं डोकं क्षणात थंड होतं. कुणाकडे गेलं की, कपभर चहाची अपेक्षा असो वा नसो, पण त्यातून आदरातिथ्य केल्याचे समाधान मात्र नक्कीच मिळते. अन्यथा ‘अमक्याच्या घरी गेले, पण तासभर बसून कपभर चहा सुद्धा विचारलं नाही’ असेही ऐकू येते.म्हणजे तासभर किती छान कौतुकाच्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या असतील. पण शेवटी विषय एक कप चहावर येऊन थांबतो.

लहानपणी घुटभर चहासाठी लोळत पडणारी बालके बघितली. मग घरातील वृद्ध लोक आपल्या कपातील घुटभर चहा त्याला देऊन समजवतात. मनातून जिंकलेले भाव आणित फुर् फुर करीत बशितील चहाची मजा घेतो. मोठेपणी तोच बालक चहाचे महात्म्य सांगतो. दुष्परिणाम लक्षात घेतो. तो आमच्या पंक्तीत बसत नाही बरं का? मी चहा सोडला कधीचा, असे म्हणणारे सुद्धा आपल्याला मिळतील. परंतु कुणाकडून मिळाला तर, हमखास आस्वाद घेतल्याशिवाय मात्र राहत नाही. काही वेळेला कपभर चहा नुकसान करून जातो. वेळ व्यतीत झाल्याने बस चुकते, कामाला उशीर होतो.जाण्याची घाई आहे, आत्ता नको…पुन्हा कधीतरी….असे म्हणणारे सुद्धा मनातून मात्र एक कप चहासाठी झुरत असतात.’चहा घेतला असता तर बरं झालं असतं, नाहीतरी इथे एवढा वेळ थांबावं लागलं ना.आसपास कुठे टपरी पण नाही.’ असे म्हणत तडफडत असतात.

टपरी वरून आठवलं. आज जागोजागी ‘अमृततुल्य चहा’, ‘प्रेमाचा चहा’, ‘शेठजी चहा’ अशा आकर्षक पाट्या असलेली आलिशान दुकाने अनेक ठिकाणी दिसतात. त्या मोहात पडून अचानक चालत्या गाडीला ब्रेक लावून थांबतो. आज शुगर, बीपी वाढलेले लोक नाईलाजाने चहा कमी घेतात किंवा शुगर फ्री गोळ्यांचा वापर करत तृप्त होतात. एखादी चांगली गोष्ट मित्राबरोबर घडली तर ‘चाय तो बनती है यार’ असे म्हणत घोळका चहाटपरीकडे वळतो. एक कप चहाला बोलावून लग्नाची गोष्ट छेडणारे,गोड बातमी काढून घेणारेही कमी नाहीत.

देशात चहाची सुद्धा अनेक उत्पादने आहेत. आसाम टी, ब्लॅक टी, हर्बल टी याशिवाय अद्रक चहा, बासुंदी चहा, गवती चहा, मसाला चहा सुद्धा चव देऊन जातात .चहा माणसाला जोडण्याचं काम करतो. परीक्षेच्या वेळेस सुद्धा थर्मासभर चहा घेऊन रात्रभर जागरण करत, अभ्यास करणारी मुले सुद्धा बघितलेली आहेत. मोठ्या कापडाच्या शोरूम मध्ये जा किंवा सोनारच्या दुकानात जा, तुम्ही जर मोठी खरेदी केलेली असेल, तर ग्राहकाला टिकवून ठेवण्यासाठी एक कप चहाची ऑर्डर तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळते. मग काय…मालकही खुश…ग्राहकही खुश.. जाता जाता इंग्रजांनी चहाची किटली दिली.त्याचा आस्वाद घ्या आणि आनंदी रहा.

वनिता महादेव लिचडे
त.पवनी, जि.भंडारा
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles