
कधी तू
कधी तू माझी सावली झालीस …
कळलेच नाही…
तुझ्या असण्यात मी धन्य होते ,
तुझी काळजी, तुला तळहातावर जपणे
जगण्याचा एकमेव उद्देश तू च होतीस पण….
कधी तू माझीच आई झालीस
कळलेच नाही…..
कधी तू माझी सावली झालीस…
कळलेच नाही …..
लहान असताना तुला कुशीत घेऊन झोपवायचे
आता मी थकली,खचली,कधी धीर सुटला भावनांचा..
तुझ्या मांडीवर माझं डोकं ठेऊन ,मला कुरवाळते,
कधी तुझ्या जादुई स्पर्शाने डोके दुःखी थांबते तर…
कधी बाबांचा धाक दाखवत औषध देते…
डोळ्यावरील चष्मा हळूच काढून
मला पांघरून घालते…
कधी तू एवढी समजदार झालीस
कळलेच नाही …..
माझ्या डोळ्यातले भाव तू ओळखत गेलीस तर..
कधी माझ्यावरच विनोद करत मला हसवत राहिली..
कधी तू माझी बेस्ट फ्रेंड झालीस …
कळलेच नाही …
जन्माजन्माची पुण्याई असावी माझी
म्हणून तू माझ्या उदरी जन्मा आलीस..
कधी तू माझा आधारवड झालीस..
कळलेच नाही …
कळलेच नाही……
सौ. संध्या मनोज पाटील अंकलेश्वर