
तू जवळ नसताना…..
तू जवळ नसताना
गहिवरून येते मन
तुझ्या आठवणींनी
पाणवती नयन
ह्याच ओळी शैला गुणगुणत होती.छोट्या प्रेमाची छोटी कथा तिची. होय छोटीशी लव्ह स्टोरी. शैला आणि अजय लहानपणापासूनचे मित्र. राहायला शेजारी शेजारी. त्यामुळे मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले कळलेच नाही. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. जगाची पर्वा दोघांना नव्हती. शेवटी करिअर करण्याचा प्रश्न अजय पुढे आला. शैलाला जीवनात आणायचे असेल तर काहीतरी उदरनिर्वाहासाठी केलंच पाहिजे म्हणून तो दररोज कसरत करू लागला. व्यायाम करू लागला कारण त्याला मिलिटरीत भरती व्हायचे होते आणि तो सोनियाचा दिवस उजाडला. अजय मिलिटरीत भरती झाला. शैलाचा आनंद गगनात मावेना. कारण त्याला नोकरी मिळाल्यामुळे ती घरच्यांशी आता त्यांच्या लग्नाविषयी बोलू शकत होती. पण अजयला अचानक ड्युटीवर हजर व्हावे लागले म्हणून बोलायचे राहून गेले. अजय गेला पण शैलाची मनस्थिती फार वाईट होत होती त्याच्या आठवणी तिला बेचैन करू लागल्या. दिवस रात्र आठवणीच्या हिंदोळ्यावर तिचं मन झुलत राहिलं. चातक जसा आतुरतेने वाट पाहतो पावसाची तशीच ती पण त्याची वाट पाहू लागली येण्याची. एकमेकांसोबत घालवलेले सुखद क्षण तिला छळू लागले. त्याच्या आठवणी काही तिचा पिच्छा सोडेना. या काळात एक मात्र तिला जाणवलं,’तू जवळ नसताना आयुष्य माझं व्यर्थ,तुझ्यामुळेच तर माझ्या जीवनाला अर्थ.’ रात्री झोप लागली तरी त्याच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळत होत्या. पण अचानक रात्री फोन आला. अजय युद्धात मारला गेला आणि तिने टाहो फोडला. अश्रूंच्या धारा थांबायचं नाव घेईनात. एका बातमीमुळे सुन्न झालं तिचं आयुष्य. प्रेमाची रंगवलेली सारी स्वप्न धुळीला मिळाली होती. एवढा मोठा आघात नियतीने तिच्या मनावर केला होता..’तू जवळ नसताना आता खरंच हृदयी गोड आठवणी आणि नयनी फक्त पाणी’, अशी तिची आयुष्यभराची कहाणी झाली होती. अजूनही ती त्याच धक्क्यात आहे. आजही तिचे डोळे त्याची वाट पाहत आहे कधीतरी चमत्कार घडेल आणि तो येईल अशी वेडी कल्पना करत आहे. आता ती एकदम शांत झाली आहे त्याच्याच विश्वात रममाण झाली आहे. वाचकांसाठी ही छोटीशी लव्ह स्टोरी पण शैलासाठी मात्र आयुष्यभर पुरेल अशी त्याच्या आठवणींची शिदोरी. तू जवळ नसताना….….
सौ. स्नेहल संजय काळे
फलटण, सातारा.