
नवीन मराठी शाळेत गुरुपौर्णिमा समारंभपूर्वक साजरी
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेचा अविष्कार नृत्यातून सादर करून आगळ्या वेगळ्या पध्दतीने गुरूपूजन केले. महर्षी व्यास-गणपती, सांदीपनीऋषी-श्रीकृष्ण,द्रोणाचार्य- अर्जुन, जिजाऊ-शिवराय, रामकृष्णपरमहंस- विवेकानंद, श्यामचीआईयशोदा-सानेगुरुजी,
रमाकांत आचरेकर-सचिन तेंडुलकर अशा गुरु शिष्य जोडींची वेशभूषा करून हे नृत्य नाट्य सादरीकरण करण्यात आले. विशेष निमंत्रित
साने गुरुजी कथामालेच्या शोभना जोगळेकर यांनी श्रीकृष्ण-सांदिपनीऋषी या गुरू-शिष्यांची गोष्ट सांगितली.
शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती व महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
” आपली आई ही आपली पहिला गुरू असते. पुढील जीवनात आपल्याला वडिलांचे मार्गदर्शन मिळते. शाळेमध्ये तुमचे शिक्षक हे तुम्हाला ज्ञान देऊन विद्याविभूषित करतात. म्हणून आपले आई, वडील आणि शिक्षक या तीनही गुरुजनांचा आपण खूप आदर आपण केला पाहिजे. आपल्या ईतिहासात गुरुशिष्य-परंपरा फार प्राचीन असून ती अतिशय समृध्द आहे. याचे स्मरण ठेवून तुम्ही आज नृत्यनाट्य सादर केले त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन”
शाळेतील डी. ई.एस.शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिकांचे उद्घाटन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्षिका,प्रिया मंडलिक यांनी गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली. मीनल कचरे यांनी गुरुशिष्य गीताचे लेखन केले होते. प्रतिभा पाखरे, प्रिया इंदुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.