
*समायोजन*
एकविसाव्या शतकात
संगणक क्षेत्रात क्रांती
जग जवळ आले मात्र
मन दुरावण्याची भिती… //
सोशल मीडियाचे भूत
युवा पिढीवर आरूढ
कळेना कसे हे उतरावे
मन मेंदूवरून गारूड.. //
याला व्यासंग म्हणू नये
हे आहेच जहाल व्यसन
आहारी जातोय किशोर
घालावीच लागेल वेसण.. //
पौगंडावस्था अवखळ
वळवावी तशीच वळते
भुल भुलैय्याला भुलते
बरे वाईट कुठे कळते..? //
विद्याभ्यास रोजगाराचे
याच वयात समायोजन
लक्ष राहील लक्ष्यावरच
हेच हवे योग्य नियोजन.. //
अमर्यादित डाटा वापर
सुटत चाललय भान
म्हणूनच प्रश्न येतो मनी
शाप म्हणावे की वरदान //
भावनिक अन् मानसिक
समायोजन करावे लागेल
तरच दिशाहीन युवकांना
सर्वांगीण स्थैर्य लाभेल.. //
आत्मनिर्भर कर्तृत्ववान
हर तरूण बनायला हवा
यासाठीच हवे समायोजन
तेव्हाच घडेल भारत नवा… //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*
भारी चाललं होतं सगळं
माझ्या ज्ञानमंदिरात
आनंदीआनंद होता
चोहीकडे त्या गावात.
उड्या मारत आनंदाने
चिमुकली धावायची शाळेकडे
भय भीती अन् चिंता नव्हती
पावले रमायची शाळेमध्ये.
गुरुजी नव्हतो सवंगडी तयांचा
नातेसंबंध जिव्हाळ्याचा
अडल्या नडल्या गरजवंतांचा
अशक्त सशक्त दिव्यांगांचा.
तुटपुंजे अनुदान शाळेला
त्यातच खर्च मी भागविला
तात्काळ आदेश प्रशासनाचा
पाठवा अहवाल नाना तऱ्हेचा.
फुटले पेव इंग्रजी शाळांचे
अवलंबते उदात्त शासन धोरण
संख्या घटली या विद्यामंदिराची
केले माझे इतरत्र समायोजन.
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*
नव्या जुन्याची सांगड
कष्ट होतात मनाला
समाविष्ट होता होता
होती वेदना तनाला
पिढी आजची बघता
तोल जातोय ज्येष्ठांचा
ब्रह्मज्ञान ते ऐकवून
कोंडमारा कनिष्ठांचा
घरीदारी तोच नाद
कार्यालयी होई त्रास
वाद विवाद करुनी
सांगी श्रेष्ठ मीच खास
विचारांचा ताळमेळ
प्रामाणिक,भ्रष्टाचारी
नाही होत समाविष्ट
पडे पाऊल माघारी
नाही पटता विचार
करू या समायोजन
थोडे तुझे थोडे माझे
माघाराने वळे मन
थोडे ऐकू लहानाचे
नसे त्यात अभिमान
नव्या विचारा स्वीकारू
घेऊ त्यांचे ज्ञानदान
थोडे कुठे रागवावे
चुकल्यास ते सांगावे
नव्या पिढीने ऐकावे
कष्ट त्यांचे जाणावे
*रेखा सोनारे*
तालुका जिल्हा नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*
नव्या घराची रीत तिला हळूहळू ठाऊक झाली
येता आठवण आईबाबांची ती भावुक झाली
समायोजन केले स्वप्नांचे परके होते घर
कधी कधी तिच्या हातूनही चूक झाली
घर घेतले डोक्यावर सासूचा चढला पारा
तेव्हाच तिच्या नवर्याची वाणी मूक झाली
महिलांनीच करावे समायोजन हे होते अती
सांगा पुरुष जात सदा कशी अचूक झाली
समान हक्क तिचाही असतो विसरू नका आता
अबला समजणे आता अन बोलणे खूप झाली
*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर. सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📘🔹➿➿➿➿
*समायोजन*
दारिद्य्र,
अठरा,
विश्व पसरे……,
नाही,
कुटूंबात,
चेहरे हसरे……!
दुष्काळ,
अस्मानी,
सुलतानी……..,
दोस्ती,
यांच्याशी,
“जानी-पहेचानी….!”
कुठूनच,
नाही येत,
सुखाची खबर…….,
कितीही
ताना,
“तानाचेच रबर.……!”
विधात्या,
कर कधीतरी बळीराजाच्याही,
घरी सुखाचे आयोजन……,
हटव सारे दुःख,
कर सुखाचे,
तिथे कायमचेच समायोजन…!!!
तिथे कायमचेच समायोजन…!!!
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*