
“लोककलेतून केलेला अभिनय हे समाजाचे दर्पणच”; प्रा तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण_
असो विरश्रीची रसनिर्मिती..वा असो स्वातंत्र्याचा स्फूल्लिंगं चेतवणं मनी.. असो आई बापाचं आयुष्यपट वा असो महानायकाचे चरित्रपट..असो पती-पत्नीचा संसारपट वा प्रियकर प्रेयसीचा नाजूक प्रेमपट..आपल्या अभिनयाच्या सशक्त बळावर हे सारं रंगवणं व रसिकांना तीन तास खुर्चीवर त्यांच्या मनोरंजनासाठी व संघर्ष शीण घालवण्यासाठी, आनंदयात्री बनवण्यासाठी हजारो रसिकांच्या डोळ्यासमोर उपरोक्त सारं वैभव उभे करून रसिकांना त्यांच्या प्रेमात पाडणं हेच तर रंगभूमीच्या वा पडद्यावरच्या कलावंतांचं यश व अस्सल अभिनयाचा बाज व साज आहे..! कलावंतामुळेच हे जग सुंदर झाले आहे.कलावंताच्या अप्रतिम कलाकृतींनी व अभिनयाने जगातील व जगण्यातील सौंदर्यात भर घातली आहे,लोकांचे जगणे आनंदी केले आहे ते या कलाकार मंडळींनीच..!
शिणलेल्या मनाला ताजे करण्यासाठी वा परिश्रमाचा परिहार करण्यासाठी मानवाने लोककलांचा आविष्कार केला.अभिनयाचे चित्कार,वेशभूषेचे वैविध्य यांच्या संगमातून अभिनय सम्राटांकडून म्हणजेच कलावंतांकडून वठविल्या गेलेल्या कृती श्रान्त मानवाच्या मनावर सुखद ओलावा आच्छादून त्यांच्या अनंत वेदनांना सदोदित फुंकर मारीत आल्या आहेत. हजारो प्रेक्षकांचा ऊर भरून येईपर्यंत अविरत अभिनय करून हे कलावंत आपली कला पात्रात ओतत असतात..
त्यात ‘स्त्री’ ची व्यक्तिरेखा जेव्हा पुरुष नट साकारतो तेव्हा तर..पुरुष नटाची स्त्री भूमिका म्हणजे साक्षात कठीण ‘कायाप्रवेशच’ असतो. स्त्रीचे नाजूक हसणे,लाजणे,मुरडणे,चालणे, पुरुषी देहबोलीतून स्त्रीमनाचे सूक्ष्म भाव रेखाटने व तिच्या नाजूक अदेचे सौंदर्य कमनीय मोहकतेने प्रकट करणे ही एक फार मोठी कलाच आहे.प्राचीन काळी सामाजिक बांधिलकीमुळे स्त्री भूमिकेसाठी तयार नसायच्या.पुरुषांनाच महिलांचे पात्र रेखाटावी लागत. आताही बरेचदा कथानकाची गरज म्हणून अभिनेता स्त्रीची भूमिका साकारतो.पण ‘ती’ च्या जखमांचे गोंदण व सुखाचे कोंदण साकारणे वाटतं तितकं सोपं नाही. पण तरीही ग्रामीण लोककलावंत ते साकारतात.यांच्यामुळेच खरी ग्रामीण लोककला जिवंत आहे..हेच मर्म आज चित्रातून रेखाटायचं होतं..
काहींना ही दर्पोक्ती वाटते पण खरोखर कलावंतांचा प्रतिभेचा परिसस्पर्श सौंदर्य निर्माण करून देतोय.अभिनय हे समाजाचे दर्पण आहे, त्यात प्रेक्षकांना अंतर्मुख करण्याची सर्जनशीलता आहे.मनोरंजनातून प्रबोधन करण्याची भूमिका त्यातून साध्य केली जाते.समाज स्वास्थ्य घडविण्यासाठी स्थिर राखण्यासाठी अभिनयाचा प्राण उठण्यासाठी स्वतःच्या पुरुषत्वाच्या खुणा नष्ट करून स्त्रीचे अभिनय जेव्हा हुबेहूब वठविले जातात अशा या अभिनयाचा वारसा जपणाऱ्या नटसम्राटांकडून नव्या पिढीने यांचा रंग प्रवास जाणून घ्यावा व प्रेरणा घ्यावी म्हणून इतकं मर्म भेदी चित्र दिलेलं..
एका पुरुष नटाने चित्रपटातील कंचनाच्या आत्म्याची म्हणजे स्त्रीची भूमिका साकारणाऱ्या नटाचं हे चित्र..ही भूमिका हुबेहूब साकारणाऱ्या कलावंताची आपल्या लेखणीतूनही त्याच्या कलेची श्रीमंती उतरावी म्हणून आ.राहुल सरांनी हे मर्मभेदी चित्र दिलेलं ..
शिलेदारांनी ते रेखाटण्याचा प्रयत्न केलेला..पण आज बऱ्याच जणांच्या रचनेत चित्राचा कलाटणीतील गहन मर्मभाव जरा कमी आलेला..तो येऊ द्या..सर्व सारस्वतांचे हार्दिक अभिनंदन..💐💐
थोडंसं मनातलं..-
शब्दांच्या अभिदा.. म्हणजेच लहान शब्दांवरून होणारा व्यापक बोध हा काव्याचा प्राण असतो. काव्य प्रभावी होण्यासाठी तो त्यात उतरू द्या.कलाटणीत प्रभावी आशयगर्भयुक्त मर्म येऊ द्या..
आ. राहुल सर आपण मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त आभार 🙏🙏
प्रा तारका रूखमोडे, गोंदिया
मुख्य परीक्षक सहप्रशासक कवयित्री लेखिका