
पावसामुळे ७०० हून अधिक एक्स्प्रेस-पॅसेंजर गाड्या रद्द
नवी दिल्ली: देशातील १८ राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाचा देशातील रेल्वे वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेने ७ ते १५ जुलै दरम्यान ७०० हून अधिक मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत ६०० मेल आणि एक्स्प्रेस आणि ५०० पॅसेंजर गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करावा लागल्या तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. देशातील १८ राज्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. पावसामुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर रेल्वेने ३०० मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या, १०० गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि १९१ ट्रेन वळवण्यात आल्या. उत्तर रेल्वेने ४०६ प्रवासी गाड्या रद्द केल्या, २८ गाड्या वळवण्यात आल्या आणि ५४ गाड्या पाणी साचल्यामुळे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.