
पेरणी
एकटक पाही मेघा
डोळ्या घालून अंजन
आसं लागली रे तुझी
कधी करसी रंजन
आग ओके रविराज
झाली अंगाची रे लाही
जीव झाला कासाविस
कारे झुलवितो तूही
रानवन ही सुकले
नदी नाले ही आटले
कधी येशील पावसा
डोळ्या पाणी रे दाटले
तडफडे सारे ढोरं
जिवा लागला रे घोरं
किती पहाशी तू अंत
येरे टाकूनिया सारं
चिल्लेपिल्ले ही रडती
झाले भुकेने व्याकुळ
नाही घरातही दाना
येतो पाहूनिया लळ
गेलो सावकाराकडे
पुढे पसरलो हात
मदत करण्याऐवजी
दिली ठेवूनिया लाथ
आता हटले उपाय
धीर गेलाय खचून
गळा टाकूनिया फास
घ्यावे स्वतः संपवून
परि मनी पलटूनी
आला सुंदर विचार
आणं वादळे कितीही
नाही होणार लाचार
पुन्हा पाहिल मी वाट
आणि तुझीही रे बाणी
जेव्हा येशील तेव्हा मी
सुरू करील पेरणी
प्रा दिनकर झाडे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर ,जिल्हा चंद्रपूर
====