
चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवात वाळूशिल्पाची पर्वणी; जोग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे संचलन
_समुद्राकाठची कला थेट सातपुड्याच्या टोकावर_
अमरावती: विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी बच्चू कडू यांनी उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी चिखलदरा येथील सूर्यकांत जोग सैनिक स्कूलच्या ९ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड संचलन करून महोत्सवात रंगत आणल्याचे सैनिक स्कूलच्या अखिलेश पाटील याने सांगितले.
वाळूशिल्प म्हटल्यावर दक्षिणेतील समुद्र किनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी साकारलेल्या वाळूशिल्पाचा उल्लेख हमखास होतो. सुदर्शन पटनायक यांची प्रेरणा घेऊन आता मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर देखील अनेक कलावंत वाळूशिल्प घडवत आहेत. मात्र समुद्राच्या काठावरील ही कला थेट सातपुडा पर्वत रांगेत सर्वात उंच टोकावर असणाऱ्या चिखलदरा येथे नागपूर येथील कलावंत विनायक निटुरकर यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे हे वाळूशिल्प पाहून चिखलदऱ्यात येणारे पर्यटक चकीत झाले आहेत.