
शिवसेना शिंदे गटाच्या महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद
_40 डॉक्टर अन् 10 हजार 288 कामगारांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि चष्मे वाटप_
सोलापूर: शिवसेना शिंदे गट सोलापूर शहर आणि जिल्हातर्फे मोदी येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध तपासणी आणि औषधोपचारासाठी हजारो कामगारांनी दिवसभर गर्दी केली होती. राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने राज्यभर महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
मोदी येथे झालेले महाआरोग्य शिबिर हे झोपडपट्टी भागातील राज्यातील पहिलेच महाआरोग्य शिबिर ठरले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात दात, नाक, कान, घसा तपासणी, हाडांची संपूर्ण तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग, त्वचारोग, हृदय, ईसीजी, रक्तदाब, मेंदूच्या विविध तपासण्या, मधुमेह किडनी व लिव्हर अशा तपासण्या करण्यात आल्या.
शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात तब्बल ४० डॉक्टर आणि १२३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा बजावली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, महापालिका आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. या शिबिराचा तब्बल 10 हजार 288 कामगारांनी लाभ घेतला.