
गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेने नव्याने मोर्चेबांधणी केली असून जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय नवे तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या व पक्षाच्या मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मधून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.
दैनिक ‘सामना’त प्रकाशित वृत्तानुसार, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेचे नवे शिलेदार नियुक्त केले आहेत. त्यामध्ये सुनिल पोरेड्डीवार व विलास कोडापे यांच्याकडे जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोरेड्डीवार यांच्याकडे कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर कोडापे यांच्याकडे चामोर्शी, मूलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या तालुक्याच्या सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात तीन जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी वासुदेव शेडमाके, अहेरी विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी रियाज शेख, तर आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी सुरेंद्रसिंह चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी हे जिल्हा संघटक, तर श्रीकांत बन्सोड हे जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.