
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत वर्ग तीन व वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीचा मुहूर्त अखेर निघाला आहे. त्यानुसार 27 जुलै ते 31 जुलै 2021 या कालावधीत या बदल्याचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे.
आज 23 जुलै 2021 रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात पत्र जाहीर केले आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व चारमधील कर्मचारीवर्गाची सर्वसाधारण बदली प्रक्रिया 27 ते 31 जुलै 2021 या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय 15 मे 2014 मधील तरतुदीनुसार दरवर्षी 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र सध्याच्या परिस्थितीत राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही बदल्या करू नये, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. त्यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत संवर्गनिहाय वर्ग तीन व चारमधील विविध कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही तात्पुरती स्वरूपात स्थगित ठेवण्यात आली होती.
दरम्यान, 9 जुलै 2021 चे सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय व आता 14 जुलै 2021 च्या ग्रामविकास विभागाच्या उपसचिव यांच्या शासन पत्रातील निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचारीवर्गाची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने विविध विभागाचे बदलीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. 27 ते 31 जुलै 2021 या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ही बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकता ठेऊन राबविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात समुपदेशनाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय अंतिम वास्तव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सिंचाई विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, यांत्रिकी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण व पंचायत विभागातील कर्मचारीवर्गाची ही बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.