सुरजागडच्या लोहखनिज उत्खननावरून अहेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमेकांची होणार ‘खोदाखोद’; राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपची सकारात्मक भूमिका, तर शिवसेना-काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाच्या विभिन्न अपेक्षा

विशेष वृत्तांत : द्वारा – नंदकिशोर पोटे , संपादक, मराठी इ न्यूज नेटवर्क, मो- 9511618163, 8275286440
उद्योगविरहित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडावी आणि त्यातून रोजगार निर्मितीसोबतच या जिल्ह्याचा सर्वांगिण विकास घडावा, अशी सर्वमान्य अपेक्षा आहे. मात्र त्यादिशेने प्रयत्न होताना दिसत नाहीत. सर्वपक्षीय स्थानिक नेतेमंडळी याबाबत वारंवार भूमिका बदलताना दिसले आहेत. सध्याच्या घडीला याची स्पष्ट झलक गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन प्रकरणावरून सर्वपक्षीय मंडळी एकमेकांकडे ‘बोट’ दाखवून जनतेच्या डोळ्यात ‘बोट’ खुपसत आहेत. यामागील ‘अर्थकारण’ आणि ‘राजकारण’ स्पष्ट असले तरी या मुद्द्यावर विद्यमान राज्य सरकारच्या महाविकास आघाडीत काही ‘आलबेल’ नाही, अशी सर्वदूर स्थिती आहे. याचे कारण असे की, महाविकास आघाडीमधील नेतृत्वपक्ष म्हणून ओळखला जाणारा शिवसेना पक्ष स्थानिक पातळीवर लोहखनिज उत्खनन करण्याच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचीही हीच भूमिका जवळपास स्पष्ट आहे. मूळचे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे असलेले, मात्र वर्तमान राजकीय पटलावर काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारणारे काही जबाबदार पदाधिकारीदेखील या उत्खननाच्या विरोधात आहेत. त्यामुळे काँग्रेसची विरोधी भूमिका सर्वमान्य आणि एकमत स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सुरजागडमध्ये लोहखनिज उत्खनन करू देण्यास अनुकूल असून त्यांचे स्थानिक नेतृत्व समर्थपणे आपली भूमिका पार पाडत आहे. त्यासाठी विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपल्या एका ‘खास’ व्यक्तीमार्फत उत्खननात अडचणी येणाऱ्या सर्व घडामोडी दूर सारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील या तिन्ही पक्षांची भूमिका पाहण्याजोगी असणार आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षातील भाजप मात्र मूक गिळून गप्प आहे. त्यामुळे त्यांनाही उत्खननाचे समर्थन असल्याची जनभावना आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमध्ये मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे साठे आहे. याठिकाणच्या पहाडीवर असलेले लोहखनिज उत्खनन करून त्यावर आधारित लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात उभारून स्थानिक नागरिकांना रोजगार देत या जिल्ह्याचा औद्योगिक विकास घडावा, या उद्देशाने सरकारने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला उत्खनन करण्याची लीज म्हणजे परवानगी दिली. मात्र याला स्थानिक नागरिक व ग्रामसभांनी विरोध केला, जो आजवर कायम आहे.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नैसर्गिक साधनसंपत्ती आणि बहुमूल्य वनसंपदेने नटलेला हा भाग आहे. शिवाय नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने या क्षेत्राला विशेष महत्व आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी कंपनीला लोहखनिज उत्खनन करणे सोप्पे नव्हते. त्यामुळे लीज मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत उत्खनन सुरू झाले नाही. दरम्यान, यासाठी खूप परिश्रम आणि प्रयत्न झाल्यानंतर साधारणपणे 2016 पासून याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर याठिकाणी अनेक घडामोडी घडल्या. नक्षल्यांची हिंसा, जाळपोळ, ग्रामसभांचा विरोध अशा प्रमुख घटनांचा यात समावेश होता. हे सर्व घडूनदेखील काम थांबले नव्हते. मात्र एका भीषण अपघातानंतर हे काम बंद पडले. या सर्व काळात सर्वपक्षीय नेत्यांनी लोहखनिज उत्खनन करण्यास विरोध दर्शविला होता. स्वतः विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम त्याठिकाणी अग्रस्थानी होते. मात्र आता त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांच्याच सकारात्मक भूमिकेमुळे या उत्खनन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामसभांनी व स्थानिक नागरिकांनी याला उघड विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आगामी काळात आमदार आत्राम यांना राजकीय वाटचाल सहज सोप्पी नाही, असे राजकीय समीक्षक उघडपणे बोलू लागले आहेत.

दुसरीकडे, सुरजागडमधील लोहखनिज उत्खननावरून राज्य सरकारच्या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी स्वतंत्र भूमिका मांडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्खननाला पाठिंबा आहे, तर शिवसेना – काँग्रेस – आदिवासी विद्यार्थी संघ-ग्रामसभांचा या उत्खननाला विरोध आहे. त्यामुळे आघाडीमधील स्थानिक नेत्यांमध्ये आता आंतरिक ‘खोदाखोद’ होण्याची शक्यता आहे.

(मुद्दे सुरजागडचे, वाचत रहा पुढील भागात…..)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles