
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील सोमजी चैतू सडमेक(५०) या इसमाची नक्षल्यांनी रात्री गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी सुरजागड प्रश्नावर ‘लक्ष्य’ साधून ही हत्या केल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकात त्यांनी राजकीय पक्षांवर आसूड ओढल्याने सुरजागडचा मुद्दा पुन्हा पेट घेण्याची शक्यता आहे. याबाबत कालच ‘मराठी इ न्यूज’ नेटवर्कने सविस्तर वृत्तांत प्रकाशित आणि प्रसारित करून सर्वांना ‘अलर्ट’ केले होते.
प्राप्त अधिकृत माहितीनुसार, सोमजी सडमेक यास काल रात्री नक्षल्यांनी घरुन बोलावून जंगलात नेले होते. मात्र, आज सकाळी सुरजागडपासून काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळच्या हातपंपाशेजारी सोमजीचा मृतदेह आढळून आला. नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रके टाकली होती. ‘जल, जंगल व जमिनीला लुटणाऱ्यांना अशीच शिक्षा मिळेल, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलाल नेत्यांना हाकलून लावा’, असा मजकूर पत्रकावर आहे.
सुरजागड येथील पहाडावर मागील तीन-चार महिन्यांपासून लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. यास नक्षल्यांचा विरोध असून, त्यांनी तशी पत्रकेही टाकली होती. मात्र, लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात पावले उचलली होती. त्याअनुषंगाने सोमजी सडमेक याने कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती, म्हणून नक्षल्यांनी त्याची हत्या केली असावी, अशी चर्चा आहे. शिवाय घटनास्थळी आढळलेल्या पत्रकावरुनही हेच स्पष्ट होते.
दुसरीकडे, पोलिसांनी मात्र सोमजी सडमेक हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला मजूर पुरवठा करीत असल्याची बाब फेटाळून लावली आहे. सोमजीने यापूर्वी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत लोहखाणीस विरोध दर्शविला होता, असे हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी सांगितले.
दरम्यान, सुरजागड प्रश्नावर नक्षलवादी काय भूमिकेत आहेत, याबाबत आता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करावी आणि पोलिस दलाला सहकार्य करावे, अशी जनभावना व्यक्त होत आहे.