
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ हे येत्या 10 तारखेला गडचिरोलीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण अगदीच कमी होते. या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण 6 टक्क्यांवरून 17 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बाध्य केले. त्यामुळे रविवार, 10 तारखेला दुपारी अडीच वाजता गडचिरोली येथील अभिनव लॉनमध्ये भव्य कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते अशोक जिवतोडे व प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, माजी खासदार सुबोध मोहिते, श्रीकांत शिवणकर, माजी खासदार मधुकरराव कुकडे, वंदना आवळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शाहीन बबलू हकीम, विनायक झरकर, प्रा. विठ्ठल निखुले, मनोज तलमले यांनी केले आहे.