नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला भूकंपाचे झटके, सक्रीय-निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवख्याना उमेदवारी दिल्याने सुरू झाले राजीनामासत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्षस्थ नेते आणि संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात येऊन पक्षाला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना पहिल्याच झटक्यात मोठा हादरा बसला आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय, मात्र तरीही निष्क्रिय अशी कुख्याती राहिलेल्या एका भाजप नेत्याचा पक्षप्रवेश करून घेत मोठा तिर मारल्याचा गवगवा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूकंपाचे झटके बसू लागले आहेत. पक्षाचे सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नवख्या लोकांना नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. याचा श्रीगणेशा कुरखेडा तालुक्यात झाला असून कुरखेडा तालुकाध्यक्ष जवाहर सोनकुसरे, शहराध्यक्ष सरफराज शेख, शहर कार्याध्यक्ष पंकज डोंगरे, विधानसभा उपाध्यक्ष ईश्वर ठाकूर, विधानसभा सचिव अरुण नैताम, विधानसभा सरचिटणीस रमेश रासेकर यांनी याच मुद्यावर आक्रमक होत सामूहिक राजीनामा दिला आहे.
याबाबत समाजमाध्यमात अतिशय तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पक्षाच्या जिल्हा सचिवांनीदेखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय, अशी उद्विग्ननता मांडली आहे. सोबतचं गडचिरोली जिल्ह्यातील पक्षाचे सर्वेसर्वा, प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर यांच्या भूमिकेवरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल व्हिडीओच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहिर केले आहे.
ऐन नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अशा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याने आगामी काळात पक्षाच्या वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. कुरखेडा तालुक्यातील ही राजीनामास्त्राची धग आता जिल्हाभरात पेट घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -![spot_img]()