
‘मुक्ताई’चे अभंग आजही प्रेरणादायी…!!
“मुंगी उडाली आकाशी,
तिणे गिळीले सुर्याशी”
महाराष्ट्रातील अग्रगण्य स्री संत, कवयित्री, समाजकार्यातील ज्ञानप्रबोधिनी, ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला. मराठीच्या साहित्याचे दालन भावसंपन्न केले. अलौकिक भक्तीयोगात पारंगतअसलेल्या, संत ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई …..संत मुक्ताबाई यांना प्रथमतः त्रिवार अभिवादन..! मराठीच्या साहित्यविश्वाला अनोखी प्राचीन परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत ज्यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागतो असे ताटीचे अभंग कार ‘संत मुक्ताबाई’ म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या एक असामान्य संतश्रेष्ठ होत. आत्मक्लेशामुळे आपले भाऊ संत ज्ञानदेव जेव्हा दरवाजा बंद करून बसले होते, तेव्हा दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून त्यांनी 42 अभंग म्हटले.
शुद्ध ज्याचा भाव झाला ।
दुरी नाही देव त्याला ।
अवघी साधन हातवटी ।
मोले मिळत नाही हाटी ।
कोणी कोणा शिकवावे ।
सारे शोधुनिया घ्यावे ।।
लडिवाळ मुक्ताबाई ।
जीव मुद्यल ठायीचे ठायी ।
तुम्ही तरुनी विश्वतारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।
विचारांनी अत्यंत परखड , ‘ज्ञानबोध’ ग्रंथकार मुक्ताई म्हणजे बालसंस्कारांचा खरा खजिना होय. आदिशक्ती मुक्ताई यांनी रचलेल्या अभंगवाणीतून त्यांच्या प्रज्ञेची, विचारांची भव्यता, आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवास येते. त्यांच्या शब्द शब्दातून अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भज्ञान, अविचल आत्मविश्वास याची वारंवार प्रचिती येते. हरिपाठ म्हणजे मुक्ताईचे अनुभवकण होय. अतिशय कमी वयात मातापित्यांच्या देहत्यागानंतर आपल्या भावंडांची माऊली झालेली मुक्ताई अतिशय गंभीर, सोशिक आणि समंजस होती.
तात आणि माता गेलीले येथून l
तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा l
निवृत्ती ज्ञा कोरांन्नाचे अन्न l
सांभाळा सोपान मजलागी l
विश्व उद्धाराचे कार्य करून त्यांनी चांगदेवांना ‘पासष्टी’ चा अर्थ उलगडून दाखविला. “आठ वर्षाची मुक्ताई चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची अध्यात्मिक गुरु बनली” तेव्हाच तर कृतार्थतेने चांगदेव म्हणतात… ‘मुक्ताई करे लेईले अंजन’. मला एक सांगावेसे वाटते आज भले गरज नसेल भावाला ‘ताटी उघडा’ सांगण्याची पण आपण ज्ञातच आहोत आज ताटी उघडायची ती विज्ञानाची, अहंकार मिटवण्याची, उद्विग्नता संपवण्याची, भावनेच्या अविष्कारांची. हिंसा, अहंकार , क्रूरता यातून मुक्तता हवी असल्यास मुक्ताईचे अभंग आजही प्रेरणादायी आहेतच.
पण आपले दुर्दैव आहे एवढे महान संतश्रेष्ठ साहित्य आपण कालपरत्वे विसरतोय. आपले वाचन दिवसेंदिवस कमी होतेय. मोबाईलच्या युगात पुस्तकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. बदलत्या महाराष्ट्राला आज खरी गरज आहे ती अशा संत साहित्यिकांच्या अभ्यासाची. कारण, काळाच्या ओघात त्यांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकाविध प्रयत्न आवश्यक आहेत.असे संत श्रेष्ठ म्हणजे मराठी भाषेचे पंचप्राण आहेत त्यांच्या संवर्धनासाठी मराठीचे शिलेदार समूह नेहमीच आग्रही असतो.
आज वैशाख कृष्ण दशमी. ‘संत मुक्ताई’ यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ,”संत मुक्ताई” हा विषय देऊन अनेक साहित्यिकांना भूतकाळाची पाने चाळायला लावलीत. देह रूपाने इहलोकी असणाऱ्या, परंतु साहित्य रूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताईंना यापेक्षा अनोखी श्रद्धांजली काय बर असू शकते? विषयानुरूप अनेक रचना साकारल्या गेल्यात. बहुतांशी लोकांनी मुक्ताईचा संपूर्ण जीवनपट मांडताना काव्य पण खूप सुंदररित्या फुलवलीत. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि तुम्हास खुप खुप शुभेच्छा…!!!
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
परीक्षक/लेखिका/कवयित्री