
गडकरी पंतप्रधान असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता ; बच्चू कडू
संग्रामपूर: देशात आताच्या घडीला मंदिर, मशिदीसह महागाई, बेरोजगारी, इंधनदरवाढ यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी(Nitin Gadkari) पंतप्रधान असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी गडकरींची स्तुती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटले की, मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता,असे कडू म्हणाले. देशात महागाईने डोके वर केले आहे. मात्र त्यांना काही घेणे देणे नाही. ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला, त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. संग्रामपुर तालुका आदिवासी दुर्गम भागातील लोकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहासे यांनी आपल्या स्वखर्चातून बच्चू कडू यांच्या आईच्या स्मृतिची आठवण म्हणून रुग्णवाहिका विकत घेऊन नागरिकांच्या सेवेत दाखल केली.