
‘चुकीला माफी नाही !’ मनीषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना पवारांनी स्टेजवरच झापले
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार रोखठोक व फटकळ स्वभावासाठी ओळखले जातात. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनात झालेल्या चुका त्यांनी भाषणात स्पष्टपणे बोलून दाखविल्या. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरांसह अधिकाऱ्यांना स्टेजवरच झापले. कोणत्याही कामात चूक आढळून आली की उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना ती चूक लक्षात आणून देतात.
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पर्यावरणविषयक चांगली कामगिरी केलेल्या राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका तसेच इतर विभागांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये बहुतेक पुरस्कारांचा स्वीकार करण्यासाठी अधिकाऱ्यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. त्यावरून पवारांनी खडेबोल सुनावले आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर म्हणून काम करत होते. मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून अधिकारी यांनी काम सांभाळले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनाही बोलवायला हवे होते. तिथे लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीचाही खूप मोठा वाटा होता. काही तरी कुठे तरी गंमत झालेली आहे. ती पुढच्या वेळी होऊ नये, त्यांनाही बोलावले असते तर बरे वाटले असते, असेही यावेळी पवार म्हणाले.
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त मुंबईत राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा दोन पुरस्कारांचे’ वितरण करण्यात आले. या प्रसंगी, पर्यावरणविषयक चांगली कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका तसेच इतर विभागांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
*मनीषा म्हैसकरांनाही सुनावले खडेबोल*
पुरस्कारार्थींना दिलेल्या काही प्रमाणपत्रांवर कोल्हापूर जिल्हा नमूद केले होते. पण प्रत्यक्षात ते वेगळ्या जिल्ह्यातील पुरस्कार होते. या प्रमाणपत्रांवर मनीषा म्हैसकर यांच्यासह आदित्य ठाकरे यांचीही सही होती. मनीषा म्हैसकर यांनी सही केली म्हणून आदित्य यांनी केली. शासन जेव्हा १०० कोटींचा निधी देतो, तेव्हा घरचा निधी देत नाही. सरकारचा, जनतेचा पैसा आहे. त्यामुळे त्याचे वाटपही नीट व्हायला हवे. हे असे चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी मनीषा म्हैसकरांनाही खडेबोल सुनावले.
*चुकीला माफी नाही*
मला चूक दिसली तर मी चुका काढणार. चांगले दिसले तर अभिनंदन करणार. दीडशे नव्हे, दोनशे कोटी देतो. पण चित्र बदलून टाका. सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. योग्य असेल त्याचं कौतुक करू, मोठ्या प्रमाणात पुरस्कार देऊ. पण चूक होऊ नये. जे चुकले असतील त्यांना निलंबित करा. चुकीला माफी नाही ! असे स्पष्टपणे पवार भाषणात बोलले.