
संघालयाची रेकी करणा-या दहशतवाद्याची नागपूर कारागृहातून पुलवामात रवानगी
नागपूर: शहातील महाल येथे असलेल्या संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपूर कारागृहातून पुलवामा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. जैश ए मोहम्मद या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्या उमर याचा पुलवामा येथील हस्तक रईस अहमद शेख याने संघ मुख्यालयाच्या रेकीचे काम केले होते. रईस अहमद शेख याने तीन दिवस नागपूरात मुक्काम करून संघ मुख्यालयाची रेकी केली होती. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी रईस शेखला अटक केली होती. आता दोन आठवडे नागपूर कारागृहात राहिल्यानंतर दहशतवादी रईस अहमद शेख याची रवानगी पुलवामा येथील तुरुंगात करण्यात आली आहे.
*नेमकं काय आहे प्रकरण?*
पाकिस्तानी दहशतवादीरईस अहमद शेख याने नागपुरात संघ मुख्यालय परिसराची रेकी केली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून ही रेकी करण्यात आली होती. १३ ते १५ जुलै २०२१ दरम्यान संघ मुख्यालय परिसराची रेकी केल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. नागपूरात येऊन रईस शेख याने संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केली होती. याबाबत नागपूरात कोतवाली पोलिसांनी रईस शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमध्ये जाऊन रईस शेखला अटक केली. नागपूर एटीएसने दहशतवादी रईस शेखची कसून चौकशी केली होती.
*संवेदनशील भाग*
संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवतांचं वास्तव्य असतं. शिवाय संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि भाजप नेत्यांचा या परिसरात वावर असतो. यापूर्वीही संघ मुख्यालयावर दहशतवादी हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. संघ मुख्यालयाचा अतिशय संवेदनशील वास्तूंमध्ये समावेश होतो.