
माझ्या प्रेमात पडू नका; पक्ष मजबूत करण्यासाठी पुढे या; उद्धव ठाकरे
_’राहते ती निष्ठा आणि तरंगते ते विष्ठा’_
मुंबई: माझ्यापेक्षाही बाळासाहेबांचं लाडकं अपत्य जर कोणतं असेल तर ते शिवसेना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याला सत्तेचा लोभ नाही, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. तसेच माझ्या प्रेमात पडू नका मी कुणालाही अडवत नाही, शिवसेना अजूनही मजबूत आहे. आणखी मजबूत करायची आहे, त्यासाठी शिवसैनिक म्हणून पुढे या असं त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शिवसेना भवन येथे जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला. तुमचं भविष्य उज्ज्वल असेल तर, तुम्हीही तुमचा निर्णय घेऊ शकता. जिद्द असेल तर राहा, नाहीतर तुम्हीही सोडून जा, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्याचवेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं एकमुखानं सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तब्बल चौथ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं. यावेळी त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबाबत पहिल्यांदाच बंडखोर असा शब्द वापरला. तसेच एकनाथ शिंदेंवरही त्यांनी घणाघाती टीका केली. आमदार संजय राठोड यांच्या पाठी उभं राहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आमदारांचं जे बंड झालं त्यामागे भाजपच असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘राहते ती निष्ठा आणि तरंगते ते विष्ठा’ विष्ठेवर तंरगणारे हे बंडखोर निघाले तेव्हा तुम्ही ठरवा तुम्हास काय करायचे असेही शिवसैनिकांना त्यांनी आवाहन केले.