
हिंगणा तालुक्यातील 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
_निरंतर परिश्रम हेच यशाचे माध्यम – पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड_
सतीश भालेराव, नागपूर
हिंगणा:- संत गमाजी महाराज शिक्षण संस्था व जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या संयुक्त आयोजनातून माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या अध्यक्षतेखाली व नागपूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांच्या हस्ते हिंगणा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे या उद्दात हेतूने हिंगणा तालुक्यातील 27 माध्यमिक विद्यालये व 11 कनिष्ठ महाविद्यालये यातील गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचे संत गमाजी महाराज शिक्षण संस्था व रायपूर जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी हिंगणा येथील ग्रीन वेलवेट लॉन येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
अभ्यासाची आवड आणि त्यात निरंतर परिश्रम यातूनच यश प्राप्त करता येते. परिस्थिती अनुकूल असो या प्रतिकुल जर मनात ध्येय गाठण्याची प्रखर इच्छाशक्ती असेल. आभाळाला गवसणी घालणारे स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आजच्या विद्यार्थ्यांनी अगदी पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच प्रशासकीय सेवेच्या तयारीला लागावे आणि निरंतर परिश्रम करावे. आपल्याला यश 100% मिळेल यात दुमत नाही असे प्रतिपादन हिंगणा येथील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस उपाधीक्षक पूजा गायकवाड म्हणाल्या. तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना रमेशचंद्र बंग यांनी हिंगणा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन करून मोठमोठ्या हुद्यावर पोहोचून तालुक्याला गौरवान्वित करावे. पुढे बोलताना बंग म्हणाले आज शेषनगर सारख्या ग्रामीण भागातील गावातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करतो हे मी या भागाचा लोकप्रतिनिधी असताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या कार्याची पावती आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग होते तर नागपूर ग्रामीण पोलिस उपाधीक्षक पूजा गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचकावर जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्या रश्मी कोटगुले, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, उमेश राजपूत, वैशाली काचोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश सातपुते, संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, सुशील दीक्षित, सरपंच प्रेमलाल भलावी, सरपंच निलेश उईके, उपसरपंच दीपावली कोहाड, नगरसेवक दादाराव इटनकर, नगरसेविका मेघा भगत, नगरसेविका विशाखा लोणारे, माजी सरपंच इनायतुल्ला शेटे, हेमराज डाखोळे,दत्तात्रेय आडयाळकर, शिराज शेटे, मिलिंद कचोरे, सुनिता नागपुरे सुहास कोहाड, श्याम फलके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता स्व. देवकी बाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, गोपीकिशन बंग विद्यालयाचे प्राचार्य सुरेश गुडधे व संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.