
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रम
औरंगाबाद: दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. तंबाखूचे तब्येतीवर होणारे दुष्परिणाम व ह्या व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्तीकरिता जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने मिशन पिंक हेल्थ, आय एम ए औरंगाबाद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर्फे संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या एम बी बी एस विद्यार्थ्यांकरिता ३१ मे रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिष्ठाता डॉ सईदा अफरोज होत्या. आय एम ए सचिव डॉ उज्वला दहिफळे ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अध्यक्ष डॉ सचिन फडणीस ह्यांनी तंबाखू विरोधी दिवसाचे महत्व विशद केले. मिशन पिंक हेल्थच्या अध्यक्ष डॉ रेणू बोराळकर ह्यांनी किशोरवयीन दशेमध्ये मानसिक, बौद्धिक व शारीरिक बदल कसे होत जातात हे सांगत कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन करणे घातक ठरते असे सांगितले. उपाधिष्टाता डॉ सिराज बेग ह्यांनी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रशुद्ध माहिती मिळण्यासाठी अशाप्रकारच्या सत्रांचे आयोजन करणे महत्वाचे आहे असे सांगितले.
अधिष्ठाता डॉ सईदा अफरोज ह्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला असून विद्यार्थ्यांनी तंबाखूसारख्या व्यसनापासून स्वतः दूर राहून इतरांना पण त्यापासून रोखावे. “तंबाखूचे तब्येतीवर होणारे दुष्परिणाम” ह्या विषयावर सर्जरी विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ सरोजिनी जाधव ह्यांनी तंबाखूमुळे विविध प्रकारचे कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात, रक्तवाहिन्यांचे, श्वसनसंस्थांचे आजार उद्भवतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
“तंबाखूच्या व्यसनाचे मानसिक व सामाजिक दुष्परिणाम” ह्यावर मनोविकृती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रसाद देशपांडे ह्यांनी वेगवेगळे उदाहरणे देत मार्गदर्शन केले. त्यांनी अश्या व्यसनांपासून मिळणार आनंद हा क्षणिक असतो पण त्याचे दुरोगामी घातक परिणाम त्या व्यक्तीला व कुटुंबियांना भोगावे लागते असे सांगितले.
ह्याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः तर तंबाखूसेवन न करणार नाही पण समाजातील सर्व घटकांना तंबाखूपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू अशी शपथ घेतली. ह्या उपक्रमाच्या समन्वयक डॉ शिल्पा आसेगावकर ह्यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव डॉ अपर्णा राऊळ ह्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला शरीरचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ मोहम्मद लइक, डॉ अर्चना साने, डॉ आशा गायकवाड, डॉ जयश्री भाकरे उपस्थित होते.