
पुण्यातील अरण्येश्वर विद्यामंदिरात रंगला चिमुकल्यांचा ‘दिंडी सोहळा’
वसुधा नाईक, पुणे
पुणे: दोन वर्ष कोरोनाच्या कालावधीत शाळेतील चिमुकल्यांचे बालपण हिरावल्यागत झाले होते. सध्या राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीची धामधूम सुरू असून दररोज वारक-यांचे जत्थे व पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने जाताहेत. आषाढी एकादशीचे निमित्त साधत पुण्यातील अरण्येश्वर विद्या मंदीर,सहकारनगर येथील शाळेमधे दि. ८ जुलै २०२२ रोजी बालवर्ग ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची वर्गशिक्षिका व शिक्षकवृंद यांनी शालेय दिंडी काढून चिमुकल्यांच्या चेह-यावर या निमित्ताने हास्य फुलवले.
आयोजित बाल दिंडी उपक्रमात सर्व विद्यार्थी वारकरी वेशात उपस्थित होते. अरण्येश्वर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अनिता गायकवाड या सर्व चिमुकल्यांचे कौतुक करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून आरती करण्यात आली. सर्व शिक्षक व विद्यार्थी अगदी आनंदाने या दिंडीमधे सहभागी झाले होते. वारकरी वेशात मुले खूप छान दिसत होते. दिंडीचा सोहळा अती उत्साहात, टाळांच्या गजरात साजरा झाला.
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली….
विठूनामाचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला. या अशा पारंपारिक भावगीताने अरण्येश्वर विद्यामंदिर येथील शालेय वातावरण दिंडीमय झाले होते. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.