
मराठी मातीशी नमकहरामी करणा-या कोश्यारींना उत्तराखंडला पाठवा
मुंबई: महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं मीठ खाऊन त्या मीठाशी तसेच मराठी मातीशी नमकहरामी करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर ‘बहोत हो गया’ राज्यालांना उत्तराखंडला परत पाठवा अशी सडकून टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे; तसंच जे आता नवहिंदू आहेत त्यांना यामुळे काही फरक पडलाय का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी भाजपला आणि फुटीर गटाला विचारला आहे.
महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहात आहेत आणि मराठी माणसाचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती आहे, सुंदर डोंगर-दऱ्या, पैठणी, शिवरायांचे किल्ले हे सगळं त्यांनी पाहिलं असेल. मात्र कोल्हापुरी जोडा कुणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत राज्यापलांच्या मुंबई बाबतच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
*राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनावधनाने बोललेले नाहीत*
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून हे वक्तव्य अनावधानाने आलं असेल असं वाटत नाही. काही वेळा राज्यपाल एकदम तत्पर होतात तर काही वेळा अजगरासारखे सुस्त पडून असतात. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे पडून होती. मला वाटतं की आजचा विषय तो नाही तरीही त्यांनी नेमलेले सदस्य राज्यपालांना आवश्यक वाटत नसतील तर राष्ट्रपतींशी बोलून तशी तरतूद करायला हवी होती असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज्यपाल महोदयांची भाषणं कोण लिहून देतं माहित नाही. मात्र महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणसाची ओळख ही संपूर्ण जगाला आहे मात्र राज्यपाल म्हणवणाऱ्या या व्यक्तीला मुंबईबाबत, महाराष्ट्राबाबत माहिती नाही हे दुर्दैव आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ही मुंबई कोश्यारी महोदयांनी मराठी माणसाला आंदण दिलेली नाही. तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला होता. त्या लढ्यात रक्त सांडून अनेकांनी मुंबई मिळवली आहे. १०५ हुतात्मे त्यासाठी झाले आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ही मुंबई रक्त सांडून मिळवली गेली आहे.