
क्रांतीदिनाचे काय औचित्य ?
गजानन ढाकुलकर
नागपूर :- ९ऑगष्ट क्रांतीदिन आहे. इतिहास सांगण्याची गरज नाही.मास्तरने अनेकदा शिकवला. झेंडा घेऊन मिरवला.पण क्रांती झालीच नाही तर काय उपयोग ? क्रांती समजलीच नाही, क्रांती झालीच नाही तर फक्त कलाकार सारखा कार्यक्रम होतो. इतिहासातील महापुरुषांनी क्रांती केली.ते क्रांतीवीर आणि आम्ही क्रांती चे नाटक करणारे कलाकार आहोत काय ? एक दोन तासापुरते झेंडा मिरवणारे ?नाही.क्रांतीदिन हा सांस्कृतिक कार्यक्रम नाही.सामाजिक जल्लोष नाही.राजकिय ढोंग नाही.तो स्फुर्ती दिवस आहे.आमच्या नसानसात क्रांती भिनली पाहिजे.आमचे कर्म हेच क्रांती ठरले पाहिजे. क्रांती कारकांनी परकिय शत्रू विरोधात झेंडा फडकावला. छातीवर गोळ्या झेलल्या.जेलमधे गेले.असे होणार ,असेच होणार ,ही जाणीव असूनही.तरीही ? अशी स्फुर्ती,अशी प्रेरणा,असे साहस या क्रांतीदिनाच्या निमित्ताने अंगाअंगात संचारले पाहिजे.रोमरोम जागला पाहिजे.मी आतापर्यंत असे काही केले का, जेणेकरून क्रांतीकारकांना माझे कौतुक वाटेल ? आजतरी असे काही करतो का ? आजपासून तरी काही करणार आहे का ? याचे उत्तर नकारात्मक येत असेल तर काय उपयोग क्रांती दिनाचा ? काय वाटत असेल ,त्या क्रांतिकारी विरांना? हिच काय औलाद , माझ्या नसांना ?
आमच्या देशात लोकशाही व्यवस्था लागू झाली.तरीही ज्याच्या हातात चाबी तोच चोर.आणि बाकीचे फक्त ओशाळवाणी पाहातात. हतबल होऊन रडतात. हा कायदा.तो कायदा.पोलिस.कोर्ट.येथे सर्वच फेल ठरले.आणि आम्ही मतदार सुद्धा ! एक माणूस आम्ही आमदार निवडून देतो.तो दारु विकणारा आहे कि कुंटणखाना चालवणारा,हे सुद्धा आम्ही विचारात घेत नाही.एक माणूस आमदार म्हणून निवडून देतो.तो मुख्यमंत्री ला २० कोटी देतो आणि मंत्री बनतो. ? आम्ही मुकाटपणे पाहातो. लबाड मंत्री घबाड भरून देश विदेशात जमीन, रिसोर्ट, हॉटेल ,फार्म हाऊस घेतो.आम्ही पेपरला वाचून थिजतो. तरीही आम्ही घणघणत नाही. विरोध करीत नाहीत. इतके आमचे रक्त थिजलेले, गोठलेले असेल तर क्रांती दिन मनवून काय उपयोग ? फक्त करमणूक ? फक्त चुंबाचुबी ? येथे राजकीय चोरांची मंत्री पदासाठी झोंबाझोंबी चाललेली आहे. ठाकरे कि शिंदे ? सत्तार कि पाटील ?बांगड कि भुसे ? का ?आमची सेवा करण्यासाठी कि आमची बिनपाण्याची करण्यासाठी ?हेच कळत नसेल,कळले तरी वळत नसेल तर काय उपयोग क्रांती दिनाचा ? कि फक्त देखावा ? भाड्याने घेतलेल्या कपड्यातील शिवाजी महाराज ? उसने घेतलेल्या साडीतील राणी लक्ष्मीबाई ? नाही.नाही.नाही.यासाठी हा क्रांती दिन नाही. क्रांती दिन आहे, भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आझाद अंगात संचारण्यासाठी.गांधीजी, नेहरू,पटेल,असफअली चे अवसान अंगात येण्यासाठी. इंग्रजांनो,चले जाव, म्हणण्यासाठी. हां! त्यांनी म्हटले.चले जाव.इंग्रजांचे अवसान गळाले.आता येथे थांबणे ठिक नाही.म्हणून मायदेशी पळाले.यासाठी हा क्रांती दिन आहे.
कोणी विचारत असेल कि,का हो !आता तर इंग्रज येथे दिसत नाहीत.मग, आम्ही कोणाला चले जाव म्हणू ? मित्र हो ! इंग्रज गेलेत तरी येथे जे राजकीय लोक आहेत तेच लुटमार करीत आहेत. सामान्य जनतेवर भरमसाठ जीएसटी लावून तिजोरी भरतात.आणि मनमानी लुटतात. रस्ते बनवत नाहीत.धरण बांधत नाहीत.सरकारी शाळा कॉलेज चालवत नाहीत.मग काय चालवतात ?कोणी दारूचे दुकान.कोणी सट्टा.कोणी रेतीची चोरी.कोणी धान्याची चोरी.कोणी जमीनीची चोरी.हे चोर इंग्रजांपेक्षा भयंकर आहेत.एक साधा आमदार पांच वर्षात घबाड भरून तट्ट फुगतो.बैलापेक्षा ,रेड्यापेक्षा जास्त वजन.राक्षसासारखे सुजलेले त्वांड.काय खात असतील ? किती पित असतील ?काही लाज लज्जा शरम नाही.आणि देऊन घेऊन मंत्री बनला तर अडीच वर्षात अकराशे कोटीची संपत्ती.तरीही तोच चोर पुन्हा मंत्री ? तरीही आम्हाला राग , संताप,जोश,होश येत नाही.तर मग काय उपयोग,क्रांती दिनाचा ? काय औचित्य क्रांती दिनाचे ?
एका विधानसभा मतदार संघातील तीन लाख मतदारांपैकी मंत्रीच्या भ्रष्टाचार विरोधात कोणी बोलत नसेल,मंत्रीची टांग अडवत नसेल तर काय उपयोग क्रांती दिनाचा?इतके भित्रे ,इतके भाकरभाऊ लोक कसा काय क्रांती दिन मनवू शकतात ? क्रांती कशाची खातात,हेच माहित नसेल तर,काय उपयोग क्रांती दिनाचा ? काय औचित्य क्रांती दिनाचे ? ते आधी ओळखले पाहिजे.समजले पाहिजे.अंगात भिनले पाहिजे.तर क्रांतीवीर पुढे आणि क्रांती मागे मागे येईल.क्रांती करणारच! क्रांती होणारच ! तेंव्हा क्रांती दिन नव्हे, प्रत्यक्ष क्रांती घडवू.ती वेळ आज आली आहे.परिस्थिती शोधते आहे क्रांतीवीरांना.परिस्थिती वाट पाहात आहे क्रांतीवीरांची.