
‘राशी’त लोळणा-या गुरूजीच्या दबावतंत्राचा बोलबाला
_शिक्षणाचा खेळखंडोबा भाग २_
भंडारा: मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा अमलात असूनही बाल हक्क शिक्षण कायद्याला बगल देत, जिल्हातील दगाबाज गुरूजीच्या हट्टी आणि दबावतंत्राने नागरिकांना मूग गिळून गप्प बसवले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारु नये असे बाल हक्क शिक्षण कायदा सांगतो; परंतु या ‘दगाबाज’ गुरूजीने सर्रास देणगीच्या नावाखाली फी आकारण्याचा धंदा सुरु केल्याने शिक्षणाच्या बाजारीकरणात हा मोहरा अधिका-यांवर वरचढ होत असल्याचे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
शिक्षणातले मर्म समजून ज्ञान घेण्याऐवजी, परीक्षेसाठी म्हणजेच जास्त गुण मिळवण्यासाठी आयएमपी काय आहे यावर जास्त भर दिला जातो. म्हणून शाळा महाविद्यालये आज ज्ञानदानाचे काम करतात असं म्हणावे तर हा मोठा विनोद होऊ शकतो. पूर्वी शाळा काढणारे द्रष्टे ज्ञानमहर्षी होते , कर्मवीर होते , ज्ञानयोगी होते , त्यांना दूरदृष्टी होती हे खरे असले, तरी आजचे शाळा काढणारे लोक उद्योजक झाले आहेत. कारखाना काढण्यापेक्षा शाळेचा कारखाना काढला तर या उद्योगाला कधीही मंदी येत नाही. हेच मर्म समजणारा महाभाग तेरा वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यात उदयास आला. या महाभागाने धाकदपटशाहीने ‘राशी’चे अवलोकन करत सर्व धुरधंर राजकारण्यांना शिक्षणाची मोहनी घालत शिक्षण क्षेत्रातील झारीतला शुक्राचार्य बनला.
शिक्षणाला योग्य आणि शिस्तबध्द वळण देण्यासाठी शाळांची गरज असते. शाळा स्वत : शिक्षणाची व्याख्या विसरल्याने पाहता पाहता शिक्षणाची केंद्र केव्हा मार्केट झालीत हे आपल्या लक्षातच आलेच नाही. शासनाने कितीही जाहिराती करत बढाया मारल्या तरी शासकीय शिक्षणही स्वस्त राहीले नाही आणि मोफत तर अजिबात नाही. अशा चढाओढीत आज शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झाला आहे.
शिक्षण आता ज्ञान मिळवण्यासाठी घेतले जाते असे म्हणने धारिष्ट्याचे ठरेल. शिक्षण फक्त शाळामध्ये मिळते असा कोणाचा ग्रह असेल तर तोही चुकीचा आहे. शिक्षण हे गल्ली , गाव , प्रवास , पर्यटन , बाजार , यात्रा , रस्ता , अनुभव , निसर्ग , घर , शेती , समाज , मित्र , विधी , व्यवहार , अनेक प्रकारच्या कला आदी सर्व ठिकाणी मिळत असते . पण ते शिक्षण आहे याचे भान ठेऊन सजगपणे घेता आले पाहिजे.आणि अशा नैसर्गिक शिक्षणाला योग्य आणि शिस्तबध्द वळण देण्यासाठी शाळांची गरज असते . शाळा स्वत : शिक्षणाची व्याख्या विसरल्याने पाहता पाहता शिक्षणाची केंद्र केव्हा ‘मार्केट’ झाली हे कुणालाच कळायला मार्ग नाही.