Home खानदेश बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

188

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सविता पाटील ठाकरे, सिलवासा

रसिक सारस्वतांनो.. आज जरा तुमच्या स्मरणशक्तीला ताण देते. आठवतंय का शालेय जीवनातला मराठीतला तो धडा…”दौलत”.पोळ्याचा सण ….तात्या देशमुख यांचे उपकार ….त्यांच्या मुलाला पोळ्याच्या दिवशी स्टेशनला सोडणे ….दौलत चा नकार…. बळी चव्हाणला बैलाचे मारणे….विचार न करता दौलत ने स्टेशनला सोडले… तात्याचा रोष…!!

“पोळा” हा बैलांचा सण असून सुद्धा दौलतमधली ती माणुसकी आजही आठवली, की समोर उभा राहतो तो स्वाभिमानी कष्टकरी शेतकरी. पैशांसाठी इमान विकणारे खूप पाहतो आपण अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत…पण काळ्या आईच्या कुशीत मुरलेला बळीराजा ना कधी मातीशी प्रतारणा करतो ना कधी बेइमानी. त्याचे इमान मातीशी आणि मातीत राहणाऱ्या प्रत्येकाशी…अशा शेतकऱ्यांच्या आनंदाचा दिवस म्हणजे बैलपोळा ,शेतकऱ्याचा सखा सोबती, प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी राबराब राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगाणा या राज्यातही हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालतात, ज्या खांद्यावर तो कायम शेतकऱ्याचे ओझं वाहतो त्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात.. पाठीवर झुल, अंगावर गेरूचे ठिपके,गळ्यात कवड्यांची किंवा घुंगरांच्या माळा , नवी वेसन ,नवा कासरा, पायात चांदीचे तोडे… पुरणपोळीचा गोडघोड नैवेद्य सारं काही केवळ बळीच्या त्या राजासाठीच …संध्याकाळी मारुतीच्या मंदिरापासून घरापर्यंत वाजत गाजत काढलेली मिरवणूक.

मुळात हा सण संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. पण भाव मात्र एकच आहे .पश्चिम महाराष्ट्रात व कर्नाटक तो बेंदूर असतो तर कर्नाटकातल्या काही भागात त्याला करूनुरनामी असे म्हणतात. विदर्भात व इतर भागात श्रावण अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्येला हा सण साजरा करतात. उत्तर व पश्चिम भारतात त्याला गोधन असेही म्हणतात. संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या नागपूरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ताना पोळा साजरा करतात.असं जरी असलं तरी पशुधनाविषयी आता लोकांमध्ये खूप अनास्था दिसून येते, गावोगावी गुरांसाठी राखीव असणारी गोचरणे,गव्हारे नष्ट झालीत. पण हे वाचवणे काळाची गरज आहे. म्हणूनच तर पोळ्या सारख्या ग्रामीण सणांची ओळख शहरातील शहरी बाबूंना पण व्हावी या उदात्त हेतूनं मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी येणाऱ्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पोळा’ हा विषय देऊन विचार करण्यास भाग पाडले.

एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचलीच्या अवघ्या चार सहा फटकाऱ्यांनी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे अगदी असेच कमी शब्दात गर्भित अर्थ मांडण्याचं कसब आपल्या पुष्कळ कवी कवयित्रींनी आत्मसात केले.. हेच पोळा विषयावरील कवितांमध्ये मुख्यत्वे पहावयास मिळाले. काल दि २४/०८ रोजी बहिणाबाईंची जयंती होती. विषयाच्या अनुषंगाने जेव्हा त्यांच्या साहित्याचा शोध घेतला, तेव्हा किती सुंदर शब्द फेक पहावयास मिळाली..

“आला आला शेतकऱ्या
पोया चा रे सन मोठा,
हाती घेईसन वाट्या
आता शेंदूराले घोटा..”

आपणास हे अपेक्षित आहे तरी खूप जणांनी आज खूप सुंदर प्रयत्न केला.. सजवलेल्या सर्जा राजाचे वर्णन करताना खूप खूप छान उपमांनी बैलाच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली…. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व काव्यप्रवासास अनंत शुभकामना.

पण थोडं काही ……….

कशी असावी कविता?
ज्ञानाची सरिता बनून वाहणारी
ज्ञानाने परिपूर्ण असावी..
बुद्धीला रुजवून
अन् देहाला आनंद देणारी असावी कविता…

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक व प्रशासक