
कृषीमंत्री अब्दुल सत्तार ‘मुक्काम पोस्ट अमरावती’
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी‘ उपक्रम १ सप्टेंबरपासून
अमरावती: राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी‘ हा उपक्रम १ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी (ता. एक) सकाळी नऊ वाजता होईल.
उपक्रमात श्री. सत्तार यांचे बुधवारी (ता.३१) रात्री ११ वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी श्री. सत्तार हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे एक सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी‘ उपक्रमात मंत्री श्री. सत्तार हे श्री. पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी व प्रश्न जाणून घेतील.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात १० हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचा शुभारंभ होईल. त्यानंतर त्यांचे सायंकाळी सात वाजता धारणी येथून सिल्लोड जिल्हा औरंगाबादकडे प्रयाण होईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करून सुलभ व प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.