माहेराला नजरेत साठवून घेणारी ‘गौराई’

माहेराला नजरेत साठवून घेणारी ‘गौराई’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्वाती मराडे, पुणे

विघ्नहर्त्याचे घरी आगमन झाले की घराचे जणू गोकुळ होऊन जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लगबग सुरू होते. गौरीगणपती उत्सवासाठी चाकरमान्यांची गावाकडे हजेरी लागते. आरास, रोषणाई, नैवैद्य, प्रसाद यांची जय्यत तयारी होते. घर भरलेले आणि बाप्पाच्या आगमनाने मन भारलेले असते. तरीही मन अजून कुणाचीतरी वाट पाहते. सासरी गेलेली लेक नव्यानेच जेव्हा ‌माहेरी येणार असते त्यावेळी वाटणारी आगळी आतुरता मनाला लागलेली असते.. तीच आतुरता.. तीच हुरहूर अनुभवायला मिळते.. जणू घरातील माणसेच नव्हेतर घर, अंगण, दार सगळेच तिच्या प्रतिक्षेत असतात. तिचे कोडकौतुक करण्यासाठी सगळी तयारी करताना दिसतात..

आले गणराज घरी
निरोप गौराईस दिला
तुझ्या आगमनासाठी
घरउंबरा आसुसला..!

ती केवळ येत नाही तर बरोबर नवा उत्साह आणते. कुणाला ती लेक वाटते..कुणाला महालक्ष्मी..तर कुणाला गणेशाची आई. घरात प्रवेश करतानाच धनधान्याच्या पावली.. सोन्याच्या पावली.. माणिक मोत्याच्या पावली.. गाईवासराच्या पावली.. पुत्रपौत्राच्या पावली.. असे म्हणतच माहेरवाशिणी सारखे दिमाखात तिचे स्वागत होते. सगळ्या घरात आनंदाचे, प्रेमाचे उधाण येते. कौटुंबिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक धाग्याने सर्वांना एकत्र बांधणारी ती गौराई.. महाराष्ट्रातील एक सौख्यदायी सोहळा.

ती येते त्यादिवशी तिला असते केवळ भाजी भाकरी.. पण दोनच दिवसांची ती पाहुणी.. आली आली म्हणेपर्यंत भुर्रकन दोन दिवस जातात.. त्यामुळेच दुस-या दिवशी मात्र सगळा साग्रसंगीत जेवणाचा थाट.. जो केवळ एखाद्या राजकुमारीच्याच नशिबात असेल.. हो ना.. प्रत्येक लेक बापासाठी राजकुमारीच असते नाही का?.. मग ही लेक त्याला अपवाद कशी असेल. पण लगेच उजाडतो तो तिसरा दिवस.. गौराईस निरोप देण्याचा..

का मनास लागली हुरहूर
का पापणकाठ ओलावला
गौराईस निरोप देण्याचा
दिस लगेच कसा आला..!

आज घर थोडं उदास वाटतं. तिची पावलंही जड होतात. माहेराहून निघताना वाटणारी हुरहूर तिच्याही डोळ्यात दिसते.. घरातील सगळ्यांचेच पापणकाठ ओलावतात. तिला तरी आज जेवण कुठं जातंय. केवळ शेवयाचा भात खाऊन ती निघते. एक पाऊल दाराबाहेर पडते पण दुसरे उंब-यात अडखळते. माहेराला ती नजरेत साठवून घेते. तृप्त मनाने माहेरासाठी आशिर्वच देते.. अन् पुन्हा पुढील वर्षी लवकरच माघारी येण्याचं वचन देऊन ती निघते.. खरेच हा निरोपाचा क्षण किती हळवा असतो ना.‌. तसाच हा नाजूक हळवेपण जपणारा निरोप गौराईस..!

आज चित्र चारोळी स्पर्धेच्या निमित्ताने ‘निरोप गौराईस’ देताना तिच्या आगमनासाठी दिलेला निरोप ते लेकीने माहेराहून घेतलेला निरोप इथपर्यंतचा निरोपाचा प्रवास मराठीचे शिलेदारांनी रेखाटला. निरोपाचा क्षण सर्वांनाच जड वाटतो.. हे हळवेपण शब्दबद्ध करणारे तुमचे कवीमन.. मन जिंकून गेले. गौरी गणपती सणानिमित्त विषयोचित रचना आल्या. सर्व सहभागी स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन 💐

✍️लवकरच मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था यांचा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. त्यात सहभागी होऊन आपले साहित्य प्रकाशित करण्याचा मानस पूर्ण करा‌.

स्वाती मराडे, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles