गणेशोत्सवाला हवी पर्यावरण शास्त्राची जोड; मूर्तीकार नितीन आपटे

गणेशोत्सवाला हवी पर्यावरण शास्त्राची जोड; मूर्तीकार नितीन आपटे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गोमय गणपती मूर्तींना चांगला प्रतिसाद_

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे: गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त पेंट यामुळे प्रदुषण होवून हजारो मूर्तींच्या अर्धवट विसर्जनाने वातावरण दुषित होते. म्हणून पर्यावरण प्रेमी लोकांनी यावर आक्षेप घेतल्यापासून निसर्गपूरक गणेशमूर्तीसाठी पर्याय शोधण्यास सुरूवात झाली. त्यातूनच ‘गोमय गणपती’ची संकल्पना पुढे आली.

गायीच्या शेणापासून गणपतीच्या सुबक सुंदर मूर्ती कलाकार घडवू लागले. यामध्ये प्रामुख्याने काम करणारे मूर्तीकार नितीन आपटे यांच्याशी बातचित करून गोमय गणपतीची माहिती घेतली असता या प्रकारच्या मूर्ती पर्यावरण संरक्षणा बरोबरच अनेक सामाजिक व आर्थिक विषयातही आपली महत्त्वपूर्ण भूमिका कशी निभावतात, हे नितीन आपटे यांनी उलगडून सांगितले.

गायीच्या शेणाचे गणपती करताना अगदी सोपी प्रक्रिया करावी लागते. गोमय पावडर,माती, लकडी मैदा आणि गौर गम पावडर यांचे मिश्रण केले जाते. तयार लगदा साच्यामधून काढून मूर्ती घडवल्या जातात. यात शेणाचा वापर 80% असतो. मूर्ती तयार झाल्यावर किंवा घडवताना शेणाचा अजिबात वास वगैरे येत नाही. गोमय पावडर तयार करताना
शेणातले पाणी पूर्णपणे काढले जाते. विविध साईज मध्ये मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याने लोक हवी ती मूर्ती घेऊ शकतात. मूर्तीच्या किंमतींचे दर माफक असून आकारमाना प्रमाणे साधारण रू. 700 ते 2500 पर्यंत किंमतीच्या मूर्ती आहेत.

यंदा एका स्टाॅलवर अल्पावधीत 100 मूर्ती विकल्या गेल्या, याचे खूप समाधान आहे. लोकांचा इतका उत्तम प्रतिसाद मिळाला कारण गोमय गणपती का घ्यावा, याची शास्त्रीय कारणे आम्ही लोकांना पटवून दिली. ते पटल्यावर लगेच लोक या मूर्ती खरेदी करायला तयार झाले, अशी माहिती यावेळी आपटे यांनी दिली. निसर्गपूरक मूर्ती खरेदी करताना पर्यावरणाचा विचार लोकांनी केला, तसाच मूर्ती तयार करणारांसाठीसुध्दा आर्थिक विचार करण्यात येत आहे. आर्थिक उत्पन्नासाठी गरीब शेतमजूर व पशुपालकांना पैसे कमवण्याचे या निमित्त एक साधन मिळेल. त्यांच्याकडे सहज उपलब्ध असलेल्या पाळीव पशुधनापासून मिळणारे शेण , त्यावर करावी लागणारी सोपी प्रक्रिया याआधारे अल्प भांडवलावर हा व्यवसाय ऊभा करता येतो.

ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांना यातून नक्कीच उत्पन्न काढता येईल. ग्रामीण व आदिवासी शेतकरी, ठाकर समाज, डोंगर द-यातील पशुपालक अशा लोकांकडे खिलार जातीच्या गायी मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. त्या गायींपासून मिळणारे शेण गोमय गणपती मूर्ती बनवण्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त आहे. म्हणून शक्यतो गणपती निर्मिती करणारे त्यांच्या कडूनच शेण विकत घेतात. शिवाय आसपासच्या परिसरातील गरजूंना मूर्ती तयार करण्याचे ट्रेनिंग दिले जाते. यातून या अल्प उत्पन्न गटातील लोकांना रोजगार मिळू लागला आहे.

खिलार जातीच्या गायीचे शेण पर्यावरणात अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामुळे जमिनीखाली पाणी मुरण्यास आणि जलसाठा वाढवण्यास मदत होते. 1 किलो शेण जमिनीत साधारण 70 लिटर पाणी धरून ठेवते, त्यामुळे जमीन सुपीक होते, हे शास्त्रोक्त महत्वं गोसेवा पथकाचे कार्यकर्ते संबंधित लोकांना पध्दतशीर समजावून सांगतात. यातून
सामाजिक बांधिलकी जपून त्याची सांगड आर्थिक उत्पन्नाशी बांधली जात असल्याने उपेक्षित व वंचित घटकांना यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. शिवाय पर्यावरण रक्षण आणि संतुलन या दोन्ही बाबी सांभाळता येतात. हे सर्व विधायक काम प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात घडून येण्यासाठी याचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन अनेक तरूण स्वयंसेवक आदिवासी व ग्रामीण भागात प्रवास करून लोकसंपर्क करतात. संबंधित घटकांना याचे महत्वं पटवून देतात. नितीन आपटे हे स्वतः शहरातील विविध सोसायटी मेंबर्सना भेटून याबाबत जनजागृती करीत आहेत.

नितीन आपटे हे राष्ट्रीय गोसेवा, सिंहगड भाग प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोमय गणपती मूर्ती साकार करणारी मोठी टीम तयार झाली आहे. तृप्ती, कुमार, विश्वास अग्निहोत्री, प्राजक्ता, अश्विनी बेलन, आनंद कोल्हटकर, भाग्यश्री कोल्हटकर आणि मनीष कुलकर्णी हा उपक्रम राबवण्यात उत्साहाने सहभागी होतात.

गेली दोन वर्ष हा उपक्रम जोमोने सुरु आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरीस मूर्तीला 100% पर्यवरणपूरक पर्याय म्हणून गोमय गणपती मूर्ती सर्व समाजाने स्वीकाराव्यात असे आवाहन नितीन आपटे यांनी केले आहे. गणपती दीड दिवसाचा असो, पाच दिवसांचा असो की दहा दिवसांचा, गणेशमूर्ती विसर्जनानेच या उत्सवाची सांगता होते. “गणपती गेले गावाला चैन पडेना जिवाला” असे म्हणताना गणपतीला निरोप देण्याची हुरहूर गणेशभक्तांच्या मनाला लागून राहते. आपला गणेश नीट पाण्यात प्रवाहीत झाला असेल ना, याची काळजी वाटते. पण गोमय गणपती मूर्तीची स्थापना घराघरात झाली तर अशी हूरहूर लागणार नाही, आणि जिवाला नक्कीच चैन पडेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles