
राज ठाकरेचे विश्वासू मुख्यमंत्र्याच्या भेटीला
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंचे विश्वासू असणाऱ्या दोन नेत्यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी शुक्रवारी वर्षा निवास्थानी गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानावरील गणपतीचं दर्शन घेतलं व एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली.
मनसे व शिंदे गटातील नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वाढत्या भेटीगाठी म्हणजे नव्या युतीचे संकेत तर नाहीत ना, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेचे 50 आमदार फोडले. त्यानंतर शिवसेनेते अनेक पदाधिकारी व नगरसेवक पण एकनाथ शिंदेंना सामील झाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेनेपण शिंदे गटाला समर्थन दर्शवलं. त्यामुळे आता शिंदे गट आणि मनसेची वाढती जवळीक युतीतून पाहायला मिळणार का?, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.