
‘मुलांना हवा असतो पालकांचा सहवास’; डाॅ पल्लवी कासंडे
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: “मुले आणि पालकाना एकमेकांचा सहवास किती मिळतो, त्यांच्यात संवाद होतो का, मुलांच्या गप्पांचे विषय पालकांना आपले वाटतात का, मुलांना फक्त वस्तू नको असतात, तर हवा असतो पालकांचा सहवास” असे प्रतिपादन लहान मुलांच्या भावनिक गरजांद्दल बोलताना समुपदेशक डाॅ पल्लवी कासंडे यांनी केले. बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळातील कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतील बाया कर्वे स्त्री अभ्यास केंद्राच्या स्वाती रानडे व अनघा कुलकर्णी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पल्लवी कासंडे यांनी एकुलत्या एक मुलांचे प्रश्न सवंगड्यांच्या साथीने कसे सुटू शकतील, याबाबत पालकांना मार्गदर्वन केले. त्या म्हणाल्या,” आई-वडीलांनीही मुलांचे सवंगडी व्हायला हवे. त्यासाठी त्यांना काही कौशल्ये आत्मसात करावी लागतील.
अनेक कुटुंबात आजी-आजोबा असे नातवंडांचे सवंगडी- सोबती होत असल्याची उदाहरणे आहेत”. उपस्थितांना ‘The Please Book’ ही मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडविणारी सुंदर फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत पालकांनी समुपदेशक पल्लवी कासंडे यांना प्रश्न विचारून चर्चेत भाग घेतला. मुलांना सारखं काहीतरी सांगायचं असतं, ते पालकांना कळतं का.. मुलांमध्ये आणि त्यांच्या मित्रमैत्रिणीत काही समान धागा असतो का, तो कसा शोधायचा, मुलांना मित्रांकडून नेमकं काय हवं असतं, अशा अनेक बाबींवर यावेळी उहापोह करण्यात आला.
पालकांना पालकपण निभावणं सोप्पं जावं, यासाठी ‘सुजाण पालक मंडळ’ चे काम गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने इथे चालू असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.