
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या बदनामीसाठी मोठे कट कारस्थान
नवी दिल्ली: पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ होत असल्याच्या आरोपांना रामदेवबाबा यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. पतंजलीच्या बदनामीसाठी काही लोकांकडून षडयंत्र रचले जात आहे असा आरोप बाबा रामदेव यांनी यावेळी केला.
काही लोक पतंजली आणि बाबा रामदेव यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन ते तीन दशकांपासून लोक मला ओळखत आहेत. परंतु, अलीकडे पतंजलीविरोधात प्रचार केला जात आहे. परंतु, अशा लोकांना मी सोडणार नाही. पतंजलीची बदनामी करणा-या जवळपास ९० लोकांना कायदेशीर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी बाबा रामदेव यांनी दिली. बाबा रामदेव म्हणाले मार्केटमध्ये नाव कमवण्यासाठी खूप वर्षे लागतात. परंतु, हे नाव खराब करण्यासाठी काही क्षण लागतात.
एखाद्या आरोपामुळे अनेक वर्षांपासून तयार केलेली ओळख अगदी काही क्षणात ढासळते. काही लोकांना पतंजलीची प्रगती सहन होत नाही. त्यामुळे पतंजलीला बदनाम करण्यासाठी पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत. परंतु, हे सर्व आरोप पूर्ण पणे खोटे आहेत. रूची सोयाची ४३०० कोटींमध्ये खरेदी केली केली होती. तीच आज जवळपास ५० हजार कोटींची उलाढाल असलेली कंपनी बनली आहे. २०४७ ला भारताला स्वतंत्र होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी हीच उलाढाल शंभर कोटींच्या जवळ असेल.
पतंजली ग्रुपची सध्या ४० हजार कोटींची उलाढाल आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल शंभर कोटी होईल. या शिवाय येणा-या काही वर्षात आमच्या ग्रुपमध्ये पतंजली आयुर्वेदीक, पतंजली वेलनेस या नावांचा समावेश होईल. शिवाय आम्ही माध्यम क्षेत्रात देखील येत आहोत अशी माहिती बाबा रामदेव यांनी यावेळी दिली.