
उद्धव ठाकरेंची ‘मशाल’; तर शिंदेचे चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारले
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वादात शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं. यानंतर आता दोन्ही गटांना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत, तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.
*चिन्ह का नाकारण्यात आली?*
उद्धव ठाकरे यांनी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन पर्याय चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाला दिले होते. यातलं त्रिशूळ हे चिन्ह धार्मिक प्रतिक असल्यामुळे नाकारण्यात आलं, तर उगवता सूर्य हे चिन्ह डीएमकेला देण्यात आलं आहे, त्यामुळे ही दोन चिन्ह नाकारण्यात आली. शिंदे गटाकडून बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली. यातलं बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरायला निवडणूक आयोगाने परवानगी दिली. ठाकरेंप्रमाणेच शिंदे गटानेही त्रिशूळ, गदा आणि उगवता सूर्य ही दोन चिन्ह मागितली होती, पण निवडणूक आयोगाने एकाच कारणामुळे दोन्ही गटांना ही चिन्ह वापरायला परवानगी दिली नाही. ठाकरे गटाला आता नाव आणि चिन्ह मिळालं आहे, तर शिंदे गटाला अजूनही चिन्ह मिळालेलं नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना आणखी नवी चिन्ह पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*ठाकरेंची पहिली परीक्षा*
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट मशाल हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पहिली परीक्षा असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे.