
साखर उत्पादनात ‘भारत नंबर वन’; ब्राझीललाही टाकले मागे
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: ऊस उत्पादनात अग्रभागी असणा-या महाराष्ट्राने आता साखरेचं विक्रमी उत्पादन केले असून 36.66 मिलियन मे. टन इतक्या उत्पादनवाढीने ब्राझीललाही मागे टाकून आपला भारत देश आता साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा ठरला आहे. महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा. शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या गाळप हंगामाची सुमारे 44 हजार कोटी रूपये इतकी रोख रक्कम विविध साखर कारखान्यांकडून शेतक-यांच्या खात्यावर जमा झाली आहे. यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेत भर पडली असून महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे बळकटी मिळाली आहे. गेली तीन वर्ष महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडत असून जेवढा नदीखो-याच्या अंतर्गत येणारा प्रदेश आहे तो सुजलाम झालेला आहे. त्याचाच परीणाम म्हणून शेतीपूरक कृषीउद्योग प्रगतीपथावर आहेत.
कृषि उद्योगात सर्वात वरच्या क्रमांकावर आहे, तो म्हणजे साखर उद्योग. शेतक-यांना रोख उत्पन्न मिळवून देणारा साखर उद्योग कारखान्यांनाही निश्चित फायद्यात नेणारा असतो. अशा या महत्वपूर्ण उद्योगाने आता उत्पादनाचा विक्रम करून एक प्रकारे गगन भरारी घेतली असून भारताला साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आणून ठेवले आहे. भारताच्या दरडोई उत्पन्नाबद्दल वारंवार कोणत्या ना कोणत्या ना संस्थेचे अहवाल प्रसिध्द होत असतात. त्यातून कमी उत्पन्नाचे निष्कर्ष दिसताच संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जाते.
पण सध्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे आशादायक अहवाल प्रसिध्द झाले आहेत. यात कृषि उद्योगाचा मोठा सहभाग असून विशेषतः साखर उद्योगाने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम केले आहे. विशेषतः जगात अनेक देश सध्या आर्थिक समस्येला तोंड देत असल्याने त्या पार्श्वभूमीवर तर हे वृत्त खूपच सकारात्मक आणि सुखद म्हणायला हवे.