
‘ठिय्या’! दु:ख गाडून महाल बांधणार्या मजुरांची जिंदगी…!!
निरंजन मार्कंडेयवार, नागपूर
नागपूर : स्वत:चे दु:ख गाडून दुसर्यांचा महाल बांधणार्या मजुरांचे प्रभावी चित्रण बुधवारी ‘ठिय्या’ या दोन अंकी नाटकात अनुभवायला मिळाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ६१व्या महाराष्ट्र मराठी राज्य नाटय़ स्पर्धेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीत आज भरगच्च उपस्थितीत लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात ‘ठिय्या’ सादर झाले. या नाटकात लेखक श्याम आस्करकर यांनी चौकाचौकात उभे असलेल्या आणि विटा-सिमेंटचे काम करणार्या मजुरांच्या सुख-दु:खाचे चित्रण प्रभावीपणे केले.
दिग्दर्शक रोशन नंदवंशी यांनी कामगारांच्या आयुष्यातील लेखकाने मांडलेल्या व्यथा कलावंतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत थेट पोचवल्या. चित्रपट बघण्याचा प्रसंग जोरदार दाद घेऊन गेला. ‘वत्सल क्रिएशन’ सांस्कृतिक मंडळातर्फे ही कलाकृती सादर झाली. तब्बल २८ कलावंतांच्या भूमिका या नाटकात होत्या, हे येथे उल्लेखनीय!
दुसर्यांची आलिशान घरे बांधणारे ठिय्या मजूर आणि त्यांच्या वाटय़ाला आलेला शिक्षणाचा अभाव, हे सूत्र या नाटकात लेखकाने हाताळले आहे. स्वत:साठी घरे न बांधता येणारे मजूर आहे त्या परिस्थितीत आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या मजुरांच्या अशिक्षितपणाचा फायदा गुंड प्रवृत्तीचे सावकारवजा लोक घेतात. या खलप्रवृत्तीचे प्रतिनिधीत्व करणारा ‘जाफर‘ हा खलनायक या नाटकात प्रज्वल भोयर या कलावंताने उत्तमरीत्या साकारला.
नाटकात दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तींच्या संघर्षात बळी जातो, तो अशिक्षित व्यक्तींचा. त्यामुळेच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा संदेश ही कलाकृती प्रेक्षकांना देते. या नाटकातील ‘ठिय्या’वरील बोली भाषा, चमकदार संवाद, सर्वच कलावंताचा सहज अभिनय ही जमेची बाजू होती.
‘बा’ (श्याम आस्करकर) आणि लक्ष्मी ( डॉ. रसिका गोंधळे) यांची अभिनयातील जुगलबंदी बघण्यासारखीच! श्याम आस्करकर लिखित, रोशन नंदवंशी दिग्दर्शित हे नाटक समाजातील वंचित घटकांच्या व्यथा आणि वेदनांचा विचार करायला रसिकांना भाग पाडते, हे महत्त्वाचे!
मात्र, चित्रपटाच्या पोस्टरच्या बदलातून नाटकाचे नेपथ्य अधिक प्रभावी करता आले असते, अंतया आणि रमा यांचे पावसाचे दृश्य पुरेसे उठावदार होत नाही, मजुरांच्या स्लॅबच्या कामावरील क्रिया अधिक वास्तववादी करता येऊ शकल्या असत्या, हे प्रयोग बघताना जाणवले.
नाटकातील भूमिका आणि कलावंत पुढीलप्रमाणे : बा (श्याम आस्करकर), लक्ष्मी (डॉ. रसिका गोंधळे-तितरमारे), अंत्या (मोहन काळबांडे), रमा (रोशनी सेलोकर), पद्मा (मयुरी टोंगळे), जाफर (प्रज्वल भोयर), अब्दुल (अभय अंजीकर), सलीम (नीलेश सुरपाम), महादेव (रवींद्र देवघरे), मावशी (सुरेखा देवघरे), चिरकुट (अनिरुद्ध शिंगरु), चहावाला (ऋषिकेश लंगोटे), चिरकुटचे पालक (दीपक कटय़ारमल-वर्षा कोट्टावार), किराणेवाला (विनोद गरमडे), समूह कलावंत ( हर्षल हटवार, हर्षाली कायरकर, मीनल खरोडे, धीरज अढाऊ, साहिल भोयर, शुभम् पौनीकर, संकेत पुंजे, रुपाली भिसीकर, मनीष चौधरी, जयश्री तळेकर, जागृती बावणकर.
नाटकाला नेपथ्य सतीश काळबांडे, रंगभूषा बाबा खिरेकर, संगीत अभिषेक बेल्लारवार, प्रकाशयोजना ऋषभ धापोडकर, वेषभूषा सीमा आस्करकर आणि विशेष सहकार्य रवींद्र फडणवीस, सचिन वंजारी यांचे लाभले.