
‘राहुल गांधींच्या यात्रेत कमलनाथ यांनाही गोळ्या घातल्या जातील’; राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
इंदौर: महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून सध्या राज्यात आणि देशभरात बराच वाद सुरू आहे. आज राहुल गांधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहेत. कालच्या वीर सावरकर प्रकरणावरून त्यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांची ही यात्रा येत्या काही दिवसात मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहोचणार आहे. यावेळी त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाकिटावर पत्र पाठवणाऱ्याच्या जागी रतलामचे भाजप आमदार चेतन कश्यप यांचे नाव लिहिण्यात आले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी इंदूर येथे खालसा महाविद्यालयात त्यांची सभा होणार आहे. या सभेत हल्ला करण्याचा तसेच संपूर्ण इंदूर शहरातही स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंदूर येथील एका दुकानात हे पत्र सापडले आहे. पोलिस या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.
पत्रात लिहिले आहे की, “नोव्हेंबरच्या शेवटी इंदूरमध्ये जागोजागी भयावह स्फोट होतील. बॉम्बस्फोटांनी संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल. राहुल गांधींच्या यात्रेत कमलनाथ यांनाही गोळ्या घातल्या जातील. राहुल गांधींनाही राजीव गांधींकडे पाठवले जाईल.”
” 1984 साली संपूर्ण देशात भयंकर दंगली झाल्या. शिखांची हत्या करण्यात आली. कोणत्याही पक्षाने या अत्याचाराविरोधात आवाज उंचावला नाही.” असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्रात अनेक मोबाइल क्रमांकही नमूद करण्यात आहेत. पत्रासोबत एका आधार कार्डाची फोटोकॉपीही पाठवण्यात आली आहे.