
हिंगणा ते वानाडोंगरी रोडवरील अपघातात दोन तरूणांचा जागेवरच मृत्यू; टिप्परचालक फरार
नागपूर: जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ता डागडुजीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने, वाहतूक ही एक मार्गी झाली असल्याने वाहतुकीचा खोळंबा सतत निदर्शनास येत आहे. या वर्दळीच्या रस्त्याचा हकनाक त्रास नागरिकांना होत आहे. हिंगणा तालुक्यात आज सकाळी ७.४५ वा हिंगणा डी मार्ट ते वानाडोंगरी रोडवर भीषण अपघात घडला असून, या अपघातात दुचाकीस्वार दोनही तरूणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अपघात इतका भीषण होता का दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दोनही तरूणांचा चेहरा विद्रुप झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला आहे. भरधाव वेगाने मागून आलेल्या टिप्पर क्र एम एच 34 एम 8811 या वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
अपघात स्थळावरून टिप्पर चालक टिप्पर सोडून फरार झाला असल्याचे नागरिकांनी प्रतिनिधीस सांगितले. हिंगणा पोलीसांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. अपघात मृत्यू झालेल्या दोनही तरूणांची बातमी लिहेपर्यंत अद्याप ओळख पटलेली नाही. या परिसरात दररोज लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतात, परंतु आज घडलेला अपघात हा भयानक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.