
न्यू मून इंग्लिश स्कूल येथे संविधान दिनी महामानवास अभिवादन
_विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन_
प्रा. तारका रूखमोडे, (जि.प्र.)
गोंदिया: अर्जुनी/ मोरगाव तालुक्यातील न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे डॉ.बाबासाहेबांनी स्वपरिश्रमाने लिहिलेले जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान याची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी संविधान दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य सचिन मेश्राम, प्रा. उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.संविधानातील मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार,मार्गदर्शक तत्वे, नागरिकांची कर्तव्य व त्यातील अंतर्भूत सर्व कलमे, एकूणच घटनादुरुस्त्या या सर्वांची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या अनुषंगाने विविध कार्यक्रम शाळेत घेण्यात आले.सकाळी आठ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले, न्यू मून स्कूल ते रेल्वे स्टेशन व मेन रोड पर्यंत रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. शाळेत गीत गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, ‘संविधानातील मूलभूत कर्तव्य व अधिकार’ या विषयाच्या अनुषंगाने त्यावर आधारित रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा, तसेच ‘मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दहा वाजता प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. ‘माझे संविधान माझा अभिमान’ हा उपक्रम देखील जाणीव जागृतीसाठी रोज राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य सचिन राऊत, प्रा. राकेश उंदीरवाडे, प्रा. तारका रुखमोडे, लिना चचाणे, बांडे, त्रिवेणी थेर, गुंजना बडवाईक ,प्रतीक्षा राऊत, हिना लांजेवार या सर्वांनी परिश्रम घेतले.