
कडाक्याच्या थंडीचे बदलते वर्तन, येत्या दोन दिवसात पावसाचे नर्तन
प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी
गोंदिया: महाराष्ट्रात जीवघेणी शीतलहर सुरू असतानाच पुन्हा बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, 85 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा जोर वाढलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने धुक्याचे प्रमाण वाढले असून पावसाला पोषक असे ढगाळ वातावरण तयार झाले असून मागील दोन दिवसांपासून त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.
काही भागात चक्रीवादळाच्या सावटामुळे येत्या रविवारपासून बुधवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात मुसळधार व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हे चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने तिथे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे,तर नाशिक, खानदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील बैतुल, बुऱ्हानपूर,देवास, होशंगाबाद, छत्तीसगडच्या काही भागापर्यंत या वादळाच्या परिणाम जाणवणार आहे. सरासरीपेक्षा किमान चार अंश सेल्सिअस तापमानात वाढ झालेली आहे.कडाक्याच्या थंडीतही मेघगर्जनेसह पाऊस बरसणार म्हणून सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.