
“मोर्चा काढण्याची वेळच आली नाहीतर”; स्वाती मराडे
*_गुरूवारीय चित्र चारोळी परीक्षण_*
बस्स झालं आता.. किती वाट पहायची… नोकरी लागेल म्हणून शिक्षण घेतलं.. ही परीक्षा दे ती परीक्षा दे.. मुलाखतीची तयारी कर.. कोचिंग क्लास लाव.. एक ना अनेक उद्योग.. पण आता अशी अवस्था आहे.. जिकडे-तिकडे नो व्हॅकन्सीचे बोर्ड लागलेत… शिक्षणाच्या पदव्या ढीगभर पण काम नाही तसूभर.. बघता बघता नोकरीचं वय निघून गेलं.. पण मिळालीच नाही नोकरी त्यामुळे मिळत नाही छोकरी..आता लग्नाचं वयही उलटत चाललं.. पण नशिबी आहे केवळ वाट पाहणं..!
आता आमचं ठरलंय.. मोर्चा काढायचा… तोही जिल्हाधिकारी कार्यालयावर.. थोडा विचार केला, कसा मोर्चा काढायचा.. अहो मागच्याच आठवड्यात झाला ना एक मोर्चा.. काय काय अटी घातल्या होत्या बाप्पा त्यांनी.. दिलेल्या मार्गानेच मोर्चा न्यावा.. मार्गावर फटाके फोडू नयेत.. समाजात तेढ निर्माण करणारे भाषण कुणी करू नये..घातक शस्त्र आणू नयेत.. अहो मोर्चा काढायचाय तोही बंधनात राहून..पण आमची व्यथा तर निराळीच आहे.. आमच्या मोर्चासाठी ना घातक शस्त्र लागणार आहेत, ना कुणी प्रक्षोभक भाषण करणार आहे, ना समाजात तेढ निर्माण होणार आहे..आम्हाला फटाके फोडण्याची तर हौस आहे पण ते आमच्या लग्नाचे.. वाटेवर कशाला बाबा फोडायचे.. आणि मार्ग तर आम्ही बदलणारच नाही.. त्यामुळे या सगळ्या अटी आमच्यासाठी असल्या काय नसल्या काय काहीच फरक पडत नाही.. आम्ही तर निघणार घोड्यावर स्वार होऊन नवरदेवाच्या वेषात.. मग तर ऐकतील ना आमची व्यथा.. की आम्ही फक्त हास्याचाच विषय ठरणार.. आम्हालाही कळतंय हो..मोर्चा काढून आमचा प्रश्न सुटणार नाहीच पण आमची मानसिकता तरी समजेल… व्यथा तरी उमजेल..!
परवाच सोलापूर जिल्ह्यातील या अनोख्या मोर्चाची बातमी वाचली. लग्नाळू मुलांनी काढलेला मोर्चा… फक्त त्यांची व्यथा सर्वांंना समजावी यासाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक व कौटुंबिक सौख्य, आरक्षण, जाचक कायदे, शेतीमालाला भाव, हक्कांची पूर्तता, कामगार प्रश्न… एक ना अनेक व्यथा आहेत.. गा-हाणं मांडायला तसेच सनदशीर मार्गही आहेत.. त्यातलाच हा एक मार्ग.. मोर्चा.. पण सरळमार्गाने जाणारालाही आडकाठी करणारे विघ्नसंतोषी लोक असतातच.. मोर्चा सारख्या गोष्टीचेही राजकारण करतात.. प्रश्न सोडविण्यासाठी एवढी धडपड होताना दिसत नाही पण श्रेय लाटण्यासाठी सारेच सरसावतात.. हे जाणूनच की काय अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी लिहिले होते.. ‘मी माझी व्यथा कुणापुढे मांडू..ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.’.. खरंच तर आहे.. हीच आहे मोर्चेकऱ्यांची व्यथा.!
चित्र चारोळी स्पर्धेसाठी ‘मोर्चेकरी आणि व्यथा’ हा विषय आला आणि विचारमंथन सुरू झाले. जागृत समाजाचे लक्षण दाखवणारा हा मोर्चा. शांततेच्या मार्गाने सुरू ठेवून लक्ष वेधून घेतो तेव्हा ठीकच आहे. पण याला कधी हिंसक वळण लागेल याचाही काही नेम नाही.. त्यासाठीच शासनालाही काही बंधने घालावी लागतात. पण मोर्चा काढण्याची वेळच सर्वसामान्यांवर आली नाहीतर किती बरे होईल.. पण असे घडताना दिसत नाही. न्याय्य मागण्यांसाठीही लढावेच लागतेय. आपणा सर्वांनी याचा अचूक परामर्श घेतला. पीक येण्यासाठी आधी बी पेरावे लागते तसेच वाचन लेखणीसाठी उपयोगी पडते. वाचा, लिहा, व्यक्त व्हा या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏
स्वाती मराडे, पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/संकलक/कवयित्री