
बीटस्तरीय क्रीडा महोत्सवात जि.प. उच्च प्राथमिक ‘बोरडा’ शाळेचे घवघवीत यश
_रामटेक तालुक्यात पटगोवारी येथे केंद्र व बीट स्तरीय क्रीडा महोत्सव उत्साहात_
नागपूर: जिल्हा परिषद शिक्षण विभाग नागपूर अंतर्गत पंचायत समिती रामटेक येथील पटगोवारी येथे केंद्र व बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात दि. २१ व २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. बीटस्तरीय झालेल्या क्रीडा महोत्सवात पटगोवारी केंद्रांतर्गत असलेल्या जि.प. उच्च प्राथमिक शाळा, बोरडा येथील विद्यार्थ्यांनी तब्बल सहा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून शाळेला बक्षीस मिळवून दिले असल्याचे बोरडा येथील क्रीडा शिक्षक क्रिष्णा तिमासे यांनी ‘बिनधास्त’ न्यूजशी बोलतांना सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्तगुणांना बाहेर काढण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, खेळण्याची वृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने दिनांक 21व 22 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवसीय केंद्र बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा मनसरतर्फे आयोजन करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात मनसर केंद्रातील एकूण 14 शाळेंचा समावेश असल्याचे यावेळी विस्तार अधिकारी यांनी सांगितले. कोरोना काळात संपूर्ण जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे दरवर्षी होणारे केंद्र व बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करता आल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना बाहेर काढण्यास मार्ग मिळत नव्हता. मात्र या कार्यक्रमाने शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे अंगातील गुण प्रकट करण्याची संधी प्राप्त झाली.
केंद्र शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या श्रीमती कलाताई ठाकरे, पटगोवारी येथील सरपंच सुखदास मडावी, शाळा व्यवस्थापन समिती पटगोवारी येथील अध्यक्ष अविनाश भांडे, पोलीस पाटील प्रवीण माकडे, शाळा व्यवस्थापन समिती बोरडाचे अध्यक्ष बबन हजारे, शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख मनसरचे राजकुमार पचारे व मुख्याध्यापक तथा शिक्षकवृंद केंद्र मनसर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनोहर वांढरे यांनी केले. दिनांक 22 डिसेंबर 2022 ला बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सभापती पंचायत समिती रामटेक संजय नेवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती नरेंद्र बंधाटे, कलाताई ठाकरे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता तभाने आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
*जि.प. उच्च प्राथमिक शाळा ‘बोरडा’ ला बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत मिळालेले बक्षिसे*
१) वरीष्ठ लंगडी गट (मुली) -प्रथम
२) कनिष्ट लंगडी गट (मुली) -प्रथम
३) लेझीम पथक मुली -प्रथम
४) सामान्य ध्यान स्पर्धा -प्रथम
५) वक्तृत्व स्पर्धा – प्रथम
६) सामुहिक नृत्य – द्वितिय
७) पथ संचालन- प्रथम
जि.प. उच्च प्राथमिक शाळा ‘बोरडा’ येथील मुख्याध्यापक कुरेशी सर, सहशिक्षक अशोक लोहकरे, बावनकर सर, गावंडे सर, वासाडे सर, सौ.यादव मॅडम आणि क्रिष्णा तिमासे (क्रीडा शिक्षक) यांनी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.