
‘त्या’ अनमोल आठवणी सरत्या वर्षाच्या..!!
सौ पूनम माळी, सांगली
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कलाटणी देणारा दिवस येतोच. तसा माझ्याही जीवनात मला माझ्याशीच ओळख करून देणारा दिवस या सरत्या वर्षात आला. थोडक्यात म्हणायचे झाल्यास याच वर्षी आपल्या मराठीचे शिलेदार समूहाशी मी जोडले गेले. मी एका मोठ्या कुटुंबातील एक साधारण गृहिणी राहिले नाही. आता मी लेखिका, कवयित्रीही बनू शकते हा आत्मविश्वास मला आला. या वर्षात मनाला प्रसन्न करणाऱ्या तसेच मनाला दुःखी करणाऱ्या गोष्टीही घडल्या. पण जास्तीत जास्त सुख मिळण्याचेही समाधान मनाला आहेच. या वर्षी मार्चमध्ये माझ्या मुलाला १ वर्ष पूर्ण झाले. त्याच्या सर्वांगीण विकासाचे टप्पे पाहण्याची मजा मला या वर्षी घेता आली.
माझ्या आयुष्यातील लिखाणातील पहिला पुरस्कार म्हणजे ‘साहित्यगंध पुरस्कार २०२२’ हा मला मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे यावर्षी मिळाला. या पुरस्काराचे सारे श्रेय मी फक्त आणि फक्त आपल्या संस्थेचे अध्यक्ष मा.राहुल सरांना देते. त्यांनीच दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी दिवाळी अंकात माझा लेख लिहू शकले. त्यांनी आतापर्यंत माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मी आता कविता लेख लिहू शकते. अजून एक चांगली गोष्ट या वर्षात माझ्यासोबत घडली ती म्हणजे “हायकू काव्य”. विचारात पडला असाल ना? की हायकू काव्याचे एवढे काय? सुरुवातीला न कळणारा काव्य प्रकार आज माझा सर्वांत आवडीचा काव्य प्रकार झाला आहे. त्यात तारका ताई, संग्राम दादा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माझ्या चारोळी, हायकू काव्याला खूप वेळा सर्वोत्तम म्हणून माझ्या लिखाणास प्रेरणा दिल्याबद्दल मी परीक्षक, अध्यक्ष, संचालक मंडळ, सदस्य सर्वांचे मनापासून आभार मानते. अशाप्रकारे सर्वात मोलाच्या आठवणी या सरत्या वर्षात माझ्याकडे आठवणीच्या शिदोरीत आहेत. त्या माझे आयुष्य नक्कीच सुशोभित करतील असा मला विश्वास वाटते.