
‘भारतीय संस्कृती अश्वस्थ वृक्षासारखी’; डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक
_’प्रसाद प्रकाशन’चा अमृतमहोत्सवी सांगता_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: “जागतिक पातळीवर अंतिम सुखाच्या शोधासाठी जो समाज मनुष्य केंद्रस्थानी ठेवून प्रयत्न करीत गेला, तसेच विज्ञान केंद्रस्थानी ठेवून प्रयोग करीत गेला तरीही त्याला आजही अंतिम सुख सापडलेले नाही. या सर्व मंथनातून जे शेवटी जे हलाहल बाहेर पडले ते पचवण्याची ताकद कोणाचीच नाही; ती ताकद केवळ भारतीय संस्कृतीत आणि भारतीय अध्यात्मात आहे. ही भारतीय संस्कृती एखाद्या अश्वस्थ वृक्षासारखी आहे, ” असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘प्रसाद प्रकाशना’चा अमृतमहोत्सवी सांगता समारंभात बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी विविध ग्रंथांचा प्रकाशन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठाच्या संचालिका डॉ. उमा बो़डस आणि प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशनाचे लेखक असे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसाद प्रकाशनातर्फे डॉ. संकेत पोंक्षे लिखित ‘गंधशास्त्र’, डॉ. रमा गोळवलकर लिखित ‘प्रक्रिया स्वरूपा देवता’, आशुतोष बापट लिखित ‘भारतीय कलेतील मिथक शिल्पे’, डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित’मंथन’, पांडुरंग भागवत लिखित, ‘मला भावलेली ज्ञानेश्वरी’, डॉ. उमा बोडस लिखित ‘प्राचीन व्यवस्थापन शास्त्र’ या पुस्तकाच्या मुकुंद जोशी अनुवादित हिंदी आवृतीचे आणि निलेश कुष्टे अनुवादित इंग्रजी आवृत्तीचे, प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. अंजली पर्वते लिखित ‘साहित्य प्रसादाची अंजुली’ तसेच, वादिराज लिमये लिखित ‘श्रीवादिराजयति’ या पुस्तकांचे व अनाहत प्रकाशनातर्फे अनिल शिंदे लिखित ‘संकल्पना : शोध आणि बोध’ , डॉ. रमा गोळवलकर लिखित ‘शोध अस्मितेचा’ आणि ‘खर्जूरवाहिका व इतर कथा’ इतक्या एकूण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
इंडीक रूटस् नावाचे रेडिओ चॅनलचे अनावरण करण्यात आले. शिवाय, प्रसाद प्रकाशनाचे संस्थापक य.गो. जोशी, पूर्व संपादक मनोहर जोशी, यांच्या नावे टपाल तिकीटांचे अनावरण आणि प्रसाद प्रकाशनाचे संकेतस्थळाचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आपली संस्कृती ही प्रश्न निर्माण करणारी संस्कृती नसून प्रश्नांची उत्तरे शोधणारी संस्कृती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
मंदिरशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “विविध संस्कृतीचा अभ्यास केला असता भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती असली तरी ती
नित्यनूतन अशी आहे. या संस्कृतीची भरभराट व्हावी, अशी अपेक्षा मी आजच्या या निमित्ताने व्यक्त करतो. ”
लेखिका डॉ. रमा गोळवलकर यांनी लेखकांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद प्रकाशनाच्या संचालिका डॉ. उमा बो़डस यांनी केले.