
‘बुद्धिबळाने मुलांची बौद्धिक क्षमता वाढते’; प्रवीण ठिपसे
_गरवारे क्लब हाऊसचे बुध्दीबळ सामने_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे : बुद्धिबळ खेळल्याने मुलांची बौद्धिक क्षमता विकसित होते. व्यक्तिमत्व प्रभावी होते. बुद्धिबळ खेळातली निष्णात मुले भविष्यात समाजातील यशस्वी व्यक्ती म्हणून नाव कमावतात. बुद्धिबळ खेळाने समाजाला दिलेले हे खूप मोठे योगदान आहे” असे मत ग्रँडमास्तर प्रवीण ठिपसे यांनी गरवारे क्लब हाऊसतर्फे आयोजित वानखेडे स्टेडियम येथे आयोजित शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. पुढे आणखी बोलताना ठिपसे म्हणाले,
” माजी लोकसभाध्यक्ष, बलराम जाखड हे विद्यापीठ बुध्दीबळ चॅम्पियन होते, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे सुद्धा कॉलेज बुध्दीबळ चॅम्पियन होते. असेच आयपीएस अधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, आयआयटीयन्स अशा विविध क्षेत्रातल्या अनेक बुध्दीबळ निष्णातांनी आपले उत्कृष्ट भवितव्य घडलवलेले दिसते,” असे ठिपसे यांनी सांगितले.
मुलांना मार्गदर्शक ठरेल असे बुध्दीबळ विषयक पुस्तक व इतर संबंधित उपयुक्त माहिती संघटनेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.
वर्ष १९८५ मध्ये मॉस्को येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत “गॅरी कास्पारोवला याच्या विश्वविजेतेपदाबाबत विचारले, तेव्हा त्याने ४५ लाख खेळाडू बुद्धिबळ खेळतात. त्यापैकी एक
जगज्जेता होणारच , असे सांगितल्याची आठवण ठिपके यांनी सांगून त्यांनी “शरद पवारांच्या नावे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेबद्दल गौरवोद्गार काढले.
शरद पवार अखिल भारतीय फिडे रॅपिड रेटिंग एक दिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत सात राज्यांतील विक्रमी संख्येने जवळपास सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला देशातील सर्वाधिक रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. वय ८, १०, व १२ वर्षांखालील वयोगटासाठी संयोजकांनी बक्षिसे ठेवली आहेत. सर्वाधिक बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेली ही महाबुद्धिबळ स्पर्धा असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील विजेत्याला शरद पवार चषक आणि दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. याचप्रमाणे अन्य ४५ विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या सहकार्याने गेले तीन आठवडे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत असल्याची माहिती गरवारे क्लब हाऊसचे संचालक आणि बुद्धिबळ समितीचे अध्यक्ष मोहित चतुर्वेदी यांनी दिली.
गरवारे क्लब हाऊसचे उपाध्यक्ष राज पुरोहित, कोषाध्यक्ष मनीष अजमेरा, संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नेटके नियोजन आणि शिस्तबध्द आखणी केली आहे.